अकोला :-पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया जन्मशताब्दी निमित्त अकोला जिल्हा मराठा मंडळ व वनराई अकोला यांचे संयुक्त विद्यमाने दि. 20 जानेवारी2025 ला आयोजित वनराई बालकुमार साहित्य संमेलन हे संशोधक, विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी पर्यावरण जाणिव जागृतीची पर्वणी ठरणार आहे.
पर्यावरण संदेश देणाऱ्या दिशादर्शक संमेलनात डॉ.मोहन धारिया,सुंदरलाल बहुगुणा व संमेलनाध्यक्ष सुरेशचंद्र वारघडे यांच्या निसर्गविषयक पुस्तकांसह वनराई प्रकाशन पर्यावरण ग्रंथसंपदेचे ग्रंथ दालन वाचकांसाठी अपूर्व पर्वणी असेल . तुलंगा तालुका पातुर येथील सर्वोदयी कार्यकर्ते साहेबराव पाटील तायडे यांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून देशभरात भरलेल्या सर्वोदय संमेलनात उपस्थित राहून त्या ठिकाणच्या नद्यातील सागर गोटे संकलित करून त्यांचे "भारत माता स्मृती शिल्प "राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारे दालन या बालकुमार साहित्य संमेलनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. अकोल्यातील व्यासंगी कार्यकर्ते पर्यावरण मित्र उत्कर्ष जैन यांची पर्यावरण पूरक शैक्षणिक साहित्याचे दालन या ग्रंथ प्रदर्शनात असणार आहे .त्यांनी बनवलेल्या पर्यावरण पिशव्या, पर्यावरण लेखणी, पर्यावरण पेन्सिल विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरणार आहे.
अकोलेकरांनी साहित्य संमेलनात आपल्या बालकुमारांसह सहभागी होण्याचे आवाहन आयोजक अकोला जिल्हा मराठा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील ,उपाध्यक्ष दिवाकर पाटील, प्रा.विवेक हिवरे, कोषाध्यक्ष डॉ. विनोद बोर्डे, संमेलन संयोजक बबनराव कानकिरड ,गजानन चौधरी प्रा. गजानन वाघ यांनी केले आहे.