राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवन विचार हे सर्व धर्म समभावावर आधारित होते. त्यांनी आपल्या कृतीतून व आचरणातून सर्व धर्माबद्दलची एकता व सामंजस्य दाखवले. महाराज मुस्लीम धर्माच्या दरग्यात जाऊन, ख्रिस्ती धर्माच्या प्रार्थना स्थळांना भेट देऊन आणि बुद्धाच्या स्थळांना वंदन करुन त्यांनी सर्व धर्मिंयामध्ये मिसळण्याची आणि त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्याची भूमिका घेतली होती. त्यांच्या सर्व धर्म समभावाचे तत्त्वज्ञान त्यांच्या ग्रामगीतेतही प्रतिबिंबीत झालेले आहे. राष्ट्रसंतानी गुरुच्या आश्रमाबद्दलची एक नितांत भक्ती आणि तिथल्या शांत व निर्मळ वातावरणाचे वर्णन केले आहे. तिथे ज्ञान आणि भक्तीचा संगम होतो.
मज वेडची गुरुकुंजाचे ।
आवडतो मज कणकण तिथला ।
न सुटे प्रेम मनाचे ।।धृ।।
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या भजनात गुरुकुंज किंवा गुरुच्या आश्रमाप्रती असलेले प्रेम आणि ओढ व्यक्त केली आहे. ते म्हणतात, माझे मन गुरुकुंजच्या ठिकाणी वेडे झाले. मला त्या जागेबद्दल प्रचंड ओढ लागली आहे. त्या ठिकाणावरील प्रत्येक गोष्टीवर माझे प्रेम आहे. तेथून माझे मन दूर जात नाही. गुरुकुंजातील कणकण मला आवडतो.
फळाफुलांनी मार्ग बहरला, अति निर्मळता भासे ।
चौकावरती मित्रमंडळी, करी जयगुरु उल्हासे ।।
व्दारावरती बोधवचन ते, जो तो थांबुनी वाचे ।
मज वेडची गुरुकुंजाचे ।।१।।
गुरुकुंजातील आश्रमात जाताना मार्ग स्वच्छ आणि फळे-फुलांनी फुललेला असतो. त्यामुळे तिथे अतीव निर्मळता जाणवते. चौकामध्ये गुरुदेव भक्त, मित्रमंडळी एकत्र जमा होऊन "जयगुरु" चा जयजयकार करुन आनंदित होतात. म्हणून प्रत्येक कण जिवंत व प्रिय वाटतो. आश्रमाच्या दारात लावलेली बोध-वचने प्रत्येक जण थांबून वाचतात. या ज्ञान वचनामुळे ज्ञानाचा प्रसार होतो. मला गुरुकुंजाचे खरोखरच वेड लागले आहे.
गंभीर मन अति शांत करोनी, जाती जन प्रार्थाया ।
विनम्रभावे नमन करोनी, स्तविती त्या गुरुराया ।।
प्रसन्नता त्या निरांजनीची, चिंतन विश्व सुखाचे ।
मज वेडची गुरुकुंजाचे ।।२।।
लोक मनातील नकारात्मक विचार, चिंता आणि अनावश्यक धावपळ कमी करुन, मन शांत करुन जाती धर्म न पाळता भगवी टोपी घालून सामुदायिक प्रार्थनेसाठी एका रांगेत बसतात. गुरुदेव भक्त लीन होऊन आदरपूर्वक गुरुदेवाची स्तुती, गुणगाण करुन गुरुंना प्रणाम करतात. पांढऱ्या शुभ्र आसनावर निरांजनीच्या प्रकाशाने प्रसन्नता, आनंद, समाधानी असल्याची भावना अनुभवास येते. निरांजनी म्हणजे जो शुद्ध, निर्दोष, निष्कलंक आहे असा अर्थ होतो. वाईट गुण नसलेला, सत्य असणारा प्रकाशाचा दिवा नेत्राला सुखकारक वाटतो. या सामुदायिक प्रार्थना, ध्यानामध्ये विश्वाच्या सुखाचे चिंतन केले जाते. म्हणूनच मला गुरुकुंजाची ओढ लागली आहे.
विश्व मिलन हे मंदिरातले, भरले मानवतेनी ।
सर्व धर्म आणि पंथ एकची, वाटे बघता कोणी ।।
चित्त मोहुनी जन धन विसरे, ध्यान लावी स्वरुपाचे ।
मज वेडची गुरुकुंजाचे ।।३।।
विविध संस्कृती आणि धर्मातील मंदिरांना एकत्र जोडणारा आणि त्यांच्यातील सामंजस्य वाढवणारे राष्ट्रसंतांचे कार्य अमोल आहे. गुरुकुंजात मानव जातीला तसेच माणसाला घडविणारे गुणधर्म, प्रेम, करुणा, दया आणि सर्जनशीलता आहे. येथे मानवतेची शिकवण दिली जाते. हे विश्वमंदिर मानवतेनी भरलेले आहे. येथे सर्व धर्म आणि पंथ एकच आहे असे बघतांना वाटतं. जगातील सर्व धर्माचा किंवा पंथाचा मूळ उद्देश आणि अंतिम ध्येय एकच आहे. जो मानवाला सत्य आणि नैतिक जीवनाकडे घेऊन जाते. गुरुकुंजात मन मोहुन जाते तसेच चित्त एकाग्र होते. येथे लोक पैशाला, संपत्तीला विसरून गुरुदेवाचे, ईश्वराच्या स्वरुपाचे ध्यान लावतात. ध्यानामुळे एकाग्रतेचा सराव होऊन मन शांत होते. गुरुदेवाचे स्वरुपाचे चिंतन केल्यामुळे आत्मिक शांती आणि ईश्वरी ऊर्जेचा अनुभव मिळतो. म्हणूनच मला गुरुकुंजाचे वेड लागले आहे.
नव्या युगाचा मंत्र मिळतसे, नव्या मनूची गाथा ।
जातपात ही विसरुनी सगळे, बोलती भारतमाता ।।
तुकड्यादास म्हणे मज दुसरे, दैवत नाही सुखाचे ।
मज वेडची गुरुकुंजाचे ।।४।।
हिंदू पौराणिक कथेनुसार मनू हा पृथ्वीवरील पहिला मानव मानला जातो. नव्या युगाच्या मनूची गाथा गुरुकुंजातून चालू होते. गुरुकुंजात जनतेला नव्या युगाचा मंत्र मिळतो. येथे जीवनात बदल घडविणारे किंवा प्रगतीचे नवीन विचार, तत्त्वे आत्मसात करुन नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी शक्ती, जीवन जगण्याच्या कलेचे शिक्षण मिळते. येथे सर्व जातीचे किंवा धर्माचे लोक एकत्र येऊन भारतमातेचा जयजयकार करतात. भारतीयांनी जाती भेदाच्या पलीकडे जाऊन एक राष्ट्र म्हणून एकत्र यावे. राष्ट्रसंत म्हणतात, मला दुसरे दैवत नाही. येथे गुरुकुंजात सुखाचा किंवा समृद्धीचा स्त्रोत असणारा देव आहे. मन हेच सर्व सिद्धांताचे मूळ कारण आहे. आश्रमातील गुरुदेवाचे अधिष्ठान मनाला सुख देते म्हणून मला गुरुकुंजाचे वेड लागले आहे.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....