चिमूर-वरोरा मार्गावरील तलावाच्या पाळीवरील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी अंदाजे सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. दुकानमालकांनी पोलिसात तक्रार केल्यावर श्वान व फिंगर प्रिंट पथकासह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
तलावाच्या पाळीवर अक्रम शेख यांचे सोनू महासेल हे दुकान असून, त्यांच्या दुकानातून २ लाख ५५ हजार रुपये नगदी व इतर साहित्य असा एकूण चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. राजीक वेल्डिंग या दुकानातून चोरट्यांनी दोन लोखंडी लिव्हर नेले. तर जवळच कमल असावा यांचे असावा फॅशन हाउस है कपड्यांचे दुकान असून, तेथीलअंदाजे सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. मागील काही दिवसापासून शहरात भुरट्या चोऱ्या वाढल्या. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. चोरट्यांनी चिमूर येथील दुकान फोडून मुद्देमाल लंपास केला.