वाशिम : सद्यस्थितीत सांस्कृतिक कार्य संचलनालयाकडून, पारंपारिक लोककलेच्या, लोककलावंताचे ऑनलाईन प्रस्ताव स्विकारण्यात येत असून, लोककलावंताना दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळणार आहे.त्यामुळे ह्या संधीचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी कोणतीही 'कला' अंगी नसतांनाही अनेक महिला पुरुषांकडून जिल्ह्यातून हज्जारो प्रस्ताव दाखल होतांना दिसत आहेत.त्या शिवाय कोणत्याही संस्थेद्वारे जनजागृती किंवा समाजप्रबोधनाचे कार्यक्रम कधीही केलेले नसतांना, कोणतेही व्यासपिठ गाजविलेले नसतांना,लोककलेचा कोणताच अनुभव नसतांना,मुजोरी करीत अनेक स्त्री पुरुषांकडून,दुसऱ्या कलाकारांना मिळालेल्या डिजिटल सन्मानपत्राच्या किंवा प्रमाणपत्राच्या,कॉम्प्युटर वरून कलर झेरॉक्स काढून,त्यावर स्वतःच्या हातानेच स्वतःचे नावं टाकून,दोन चार भजनाचे फोटो लावून ह्या मंडळीकडून प्रस्ताव दाखल केल्या जात असल्याचे विश्वसनिय वृत्त असून,अनेक ठिकाणी यांचेकडून काही दलाल शेकडो रुपये उकडून,यांचे प्रस्ताव तयार करून देत असल्याचेही विश्वसनिय वृत्त आहे.शिवाय काही ठिकाणी दलालांकडून, प्रमाणपत्र विक्रीचा गोरखधंदा सुरू असून,मानधनाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी,तिस ते चाळीस हजार रुपयाची मागणी करण्यात येत असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे कलावंताना सूचित करण्यात येत आहे की, कोणत्याही व्यक्तीसोबत पैशाचा व्यवहार करू नये. आपल्याला जर कुणी पैशाची मागणी करीत असेल तर सबळ पुराव्यासह त्याची संबंधित विभागाकडे रितसर तक्रार नोंदवावी. सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनआपल्या प्रस्तावाची छाननी,पडताळणी, आपल्या लोककलेचे सादरीकरण व आपल्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये खरे कलाकार कोण ? आणि खोटे कागदपत्र सादर करून मुजोरी करणारे खोटे कलाकार कोण ? हे शासनाचे अधिकारी जाणून घेणार आहेत. त्यामुळे आपण लाडक्या बहिन योजनेचा लाभ किंवा प्रधानमंत्री किसान निधीचा लाभ घेत असाल,अंगणवाडी सेविका किंवा आशा सेविका वा अंशकालिन कर्मचारी असाल तर चुकूनही दलालाच्या सांगण्यावरून खोटे प्रस्ताव दाखल करून स्वतःचे पायावर धोंडा मारून घेऊ नका.तसेच कलर झेरॉक्स केलेले डुप्लिकेट प्रमाणपत्र चुकूनही जोडू नका.कारण संबंधीत संस्थानाही शासन तुम्ही यांना प्रमाणपत्र दिले आहेत का ? असा जाब विचारू शकते. व त्यावेळी खोट्या कलाकारांचे पितळ उघडे पडणार आहे. त्यामुळे प्रस्ताव सादर करतांना विचार करूनच प्रस्ताव दाखल करावेत.प्रस्ताव दाखल करतांना १५ ते २० वर्षाचे राष्ट्रिय जनजागृतीचे किंवा पारंपारिक लोककलेच्या सादरीकरणाचे सर्व फोटो,प्रमाणपत्र,पेपरची कात्रण, नोटरीकडून प्रमाणित केलेले प्रतिज्ञापत्र व आमदार किंवा खासदार यांची शिफारसपत्र सोबत जोडणे अनिवार्य आहे.