चंद्रपूर येथे दीड महिन्यापूर्वी मंदिरात झोपी गेलेल्या दोन शेतकऱ्यांची निर्घृण हत्या झाली होती. दीड महिन्यानंतर या हत्याकांडातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासात या आरोपीने मूल येथील बिअर बार फोडल्याची कबुली दिली. या हत्येतील इतर आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जिल्हातील भद्रावती तालुक्यात येणाऱ्या मांगली गावातील जगन्नाथबाबा मठाशेजारी बापूराव खारकर व मधुकर खुजे या दोन शेतकऱ्यांची शेती आहे. परिसरात वाघाची दहशत असल्याने हे दोघेही जगन्नाथ बाबा मठात झोपले होते. 22 मार्चला सकाळी या दोघांचे मृतदेहच मंदिरात आढळून आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मंदिराची दानपेटी मंदिरापासून काही अंतरावर सापडली होती.दानपेटीतील पैसे चोरण्यासाठी या दोन्ही हत्या झाल्याच्या संशय पोलिसांना होता. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला होता. आरोपींनी मंदिर परिसरातून भ्रमणध्वनी केल्याचं तपासात आढळून आलं होतं. त्या आधारावर पोलीसांनी आरोपीला गाठले. आरोपी भंडारा जिल्हातील लाखनी न्यायालयाचा परिसरात सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची ओळख स्पष्ट केलेली नाही.
या हत्येतील इतर आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. भद्रावती न्यायालयात आरोपींना पोलिसांनी हजर केले. न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.