मानोरा/कारंजा : असत्याचा नायनाट व सत्याचा विजय करण्याकरीताच भगवान शंकरानी नटराजाचा अवतार धारण करून सत्याच्या विजया करीता तांडवनृत्य केले होते. तेव्हापासून नटराजाना नाट्यक्षेत्राचे दैवत मानले जाते. अशा नाट्यक्षेत्राचे आराध्य दैवत नटराज नटेश्वर यांना आराध्य मानूनच मतदारांनी निर्भिडपणे,निस्वार्थीपणाने नाट्यक्षेत्राच्या निवडणूकीत मतदान केले पाहीजे.उमेद्वार आपल्या जातीधर्माचा असला म्हणून त्याच्या वागणूकीवर,त्याच्या स्वभावावर, त्याच्या चुकांवर आणि त्याच्या "मी" पणावर पडदा टाकून जर तुम्ही मतदान करीत असाल तर त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊन संपूर्ण जिल्हाच नाट्यक्षेत्राच्या विकासापासून कायमचा वंचित राहू शकतो.आणि याचे दुरगामी परिणाम येणाऱ्या नगर पालिका निवडणूकीत सुद्धा दिसू शकतात. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून,नाट्य परिषदेची शाखा मानोरा व कारंजा शहरात असतांना सुद्धा येथील गरजू कलावंत आणि गरजू कलावंत महिला ह्या वेळोवेळी आर्थिक विकासापासून आणि मानधनापासून वंचितच राहील्या आहेत.
मात्र आता जर समाजाच्या बैठका घेऊन आणि आणाभाका घालून तसेच अगदी रडकुंडीला येऊन तसेच ज्यांचा लोककला किंवा नाट्यकला कलाक्षेत्राशी काडीचाही संबध नाही.अशांना समोर करून त्यांच्या आड,मतदानाची भिक मागीतल्या जात असेल तर आपल्यावर ही वेळच का यावी ? ह्याचा सुद्धा निवडणूक उमेद्वारांनी विचार करणे गरजेचे आहे.व सुज्ञ मतदारांनी सुद्धा कोणत्याही खोट्या आमिषाला बळी न पडता,उमेदवाराच्या दबावाला बळी न पडता,काळ वेळ पाहून, निःस्वार्थी,सक्षम व सच्च्या उमेद्वार कोण ? हे ओळखून त्यालाच आपला उमेद्वार म्हणून निवडून आणणे गरजेचे असल्याचे मत मानोरा येथील मतदारांनी आमचेकडे व्यक्त केले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,उद्या रविवारी, लोकशाही मार्गाने अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक होत आहे. व ह्या निवडणूकीत एकूण आठ उमेद्वार जरी आपले भविष्य अजमावीत असले तरी सुद्धा खरी लढत मानोरा व कारंजा येथील उमेदवारांमध्ये होत असून,सदर्हू निवडणुकीचा प्रेस्टिज पाँईन्ट करून काही व्यक्ती ही निवडणूक लढवीत असून,त्याकरीता राजकिय निवडणूकी प्रमाणे मार्ग अवलंबल्या जात आहे. निवडणूकीनंतर एक मात्र नक्कीच होणार आहे की,कारंजा-मानोरा नाट्य परिषद शाखांचा ( कार्यकारिणीचा ) चेहरा मोहराच बदलला जाणार आहे.व भविष्यात नाट्य परिषद शाखांच्या व्यवहाराला पूर्णतः पारदर्शकता येणार आहे. निवडणूकीनंतर केवळ नाट्यक्षेत्राच्या विकासावरच लक्ष्य केंद्रित केले जाऊन,कोणत्याही नाट्यकलावंताची प्रतारणा होणार नाही.कोणत्याही कलावंताकडे दुर्लक्ष्य केले जाणार नाही. आणि म्हणूनच नाट्य परिषदेच्या मतदारराजा असलेल्या कलावंताने जातियवादी होऊन, जातीच्या उमेद्वाराला मतदान न करता-प्रामाणिक,सज्जन, निःस्वार्थी,व सेवाकार्य करण्यास सक्षम असलेल्या उमेद्वारलाच निवडून आणणे आवश्यक ठरणार आहे.असे स्पष्ट विचार बहुतांश सुज्ञ मतदारांनी स्पष्ट केले आहेत.तसेच मतदान केन्द्रावर कोणत्याही मतदारावर दबाव टाकल्या जाणार नाही. मतदारांची पळवा पळवी होणार नाही याची दक्षता घेऊन,मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भिडपणे बजावता यायला हवा आहे.असे सुद्धा अनेक मतदारांनी आमच्या प्रतिनिधीकडे गाऱ्हाणे मांडले आहे.