वाशिम : हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांच्या अचूक अंदाजानुसार आजपर्यंत झालेल्या पावसाने जिल्ह्यातील पावसाची सरासरी गाठलेली असून,यावर्षी काही भाग सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात मृग नक्षत्रातच पेरण्या झालेल्या असल्याचे चित्र स्पष्ट झाले तर उर्वरीत भागात जूनच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पेरण्या आटोपलेल्या आहेत.सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हवा तसा पाऊस होत असल्यामुळे पिकांची स्थितीही समाधान कारक आहे. त्यामुळे या पार्श्वभूमिवर वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील ग्राम रुई (गोस्ता) या गावखेड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील, सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी सांगीतले की, सध्या पावसाबाबत अनुकूल वातावरण असून पश्चिम, मराठवाड्यातील काही भाग वगळता उर्वरीत विदर्भ मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊसधारा बरसत असून हा पाऊस पिकांना मानवणारा ठरत आहे.तसेच आज दि.5 व 6 जुलै 2024 रोजी सायंकाळी आणि दि 7 जुलै 2024 पासून पुढे दि. 06 ऑगष्ट 2024 पर्यंत सर्वदूर मुसळधार पाऊस होईल. त्याचा फायदा बळीराजाला चांगला होणार असून आजच्या काळातील नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणारे सोयाबिनचे पिक भरपूर प्रमाणात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच हातभार लागणार आहे. त्यामुळे यंदा बळीराजाचा दसरा दिवाळी गोड होईल. त्यानंतरची पिके देखील चांगलीच होणार असल्याचा अंदाज व्यक्त करीत हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी, यंदाच्या जुलै मधील चांगल्या पावसाने राज्यातील नदी नाऱ्यांना पूर येऊन धरणे भरणार असल्याने महाराष्ट्रात पाणी टंचाई जाणवणार नसल्याचे भाकित सांगितले आहे.पावसाळ्यातील पुरस्थितीचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी नदी नाले ओलांडावेत.आकाशात विजा चमकत असतांना कोणीही शेतात थांबू नये.शेतातील उंच अशा हिरव्या झाडावर विजा कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन, भर पावसात, ओलेचिंब होऊ नये म्हणून हिरव्या झाडाच्या आश्रयाने थांबू नये. किंवा आपली गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या झाडाखाली बांधू नये. नदी नाले, पांदण रस्त्यात पूरसदृश्य पाणी असल्यास आपली जनावरे, बैलगाड्या,टू व्हिलर,फोरव्हिलर वाहने पुराचे पाण्यातून काढू नये. पूर पाहण्या साठी नदीच्या काठावर जाऊ नये. पावसाळ्यात धरणाचे पाणी पहाण्याचा किंवा नदीनाले धरणात आंघोळ, कपडे धुणे किंवा पोहण्या साठी जाऊ नये. विजा चमकत असतांना, फोनवर बोलणे,एफ एम रेडीओ ऐकणे किंवा लहान मुलांनी गेम खेळणे टाळावे. विजा चमकत असतांना आपल्या चिमुकल्यांच्या हातात मोबाईल देवू नये व आपले स्वतःचे मोबाईल सुद्धा स्विच ऑफ करावेत. असे आवाहन हवामान अभ्यासक गोपाल गावंडे तथा संजय कडोळे यांनी केले आहे.