चंद्रपूर, दि. 2 : आधार नोंदणी उपक्रमाचे अधिक बळकटीकरण करण्याकरीता तसेच आधार नोंदणी आणि बायोमेट्रीक अद्यावतीकरण, या सेवांचा विस्तार करून त्यांची उपलब्धता वाढविणे, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये आधार सेवा अधिक सुलभ करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयास माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याकडून आधार नोंदणी संच प्राप्त झाले आहेत.
त्याअनुषंगाने जिल्ह्यात रिक्त असलेल्या एकुण 18 महसूल मंडळ क्षेत्रात आधार नोंदणी संच वितरीत करावयाचे असल्याने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालक (महा-ई सेवा केंद्रचालक) यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 सप्टेंबर 2025 आहे.
आधार नोंदणी सेवा केंद्रांकरीता जाहिरात, जिल्ह्यात रिक्त असलेल्या 18 महसूल मंडळ क्षेत्रांची यादी, अर्जाचा नमुना, जिल्ह्याची वेबसाईट www.chanda.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी इच्छुक ‘आपले सरकार सेवा’ केंद्रचालकांनी 3 ते 18 सप्टेंबर 2025 पर्यंत (सकाळी 11 ते सायं.5) जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथील सेतू शाखेत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.