पुत्र प्राप्ती ही पूर्व सुकृता नुसारच होते. चांगले पुत्र नको असे कोणीही म्हणणार नाही पण तो पुत्र पूर्व जन्माच्या कर्मानुसार मिळत असतो. उदाः- चित्रकेतू नावाच्या राजाला अपत्य नव्हते. राणी कृतद्दृती हिला आणि राजाला पुत्रप्राप्ती व्हावी अशी इच्छा होती. एक दिवस अचानक त्यांचे घरी अंगिरा ऋषी आले. आदर सत्कार झाला. ऋषी संतुष्ट झाले. ऋषी म्हणाले की, तुला काय हवे ते माग. राजा म्हणाला आम्हाला पुत्र व्हावा. ऋषी म्हणाले, ज्यांना पुत्र आहेत ते तरी सुखी आहेत का? ऋषींनी आशिर्वाद दिला निघून गेले. वर प्रभावाने पुत्र झाला पण सवतीला मत्सर झाला आणि त्या पुत्राला सवतीने विष पाजले. तेवढयात नारद आले. आता मुलासाठी रडणे व्यर्थ म्हणून रडू नका. बऱ्याच व्यक्तीला आपली मुले त्रास देतात. तर कधी नातवाचे तोंड सुद्धा बघू देत नाही. प्रेमाने नातवाला जवळ घेऊ देत नाही असा अनुभव आहे. मातापित्याचे प्रेम असते आजोबांचे प्रेम नसते काय? श्री संत चोखोबा महाराजांच्या एक अभंगाच्या कालौघात प्रक्षिप्त झालेल्या ओळी अशा आहेत.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा ।
त्याचा तिही लोकी झेंडा ।।
कन्या ऐसी देई । जैसी मिरा मुक्ताबाई ।।
मुलगा असा निघावा की, ज्याच्या कतृत्वाचे झेंडे लोकांनी स्वर्ग, भू-पाताळ असे सर्वत्र फडकावेत. गुंडा म्हणजे तुमच्या मुलाची कीर्ती इतकी पसरायला पाहिजे की, सगळीकडे त्याचे नाव व्हायला हवे. तुमच्या मुलीचे चरित्र इतके स्वच्छ पाहिजे की, तिला मिराबाईची उपमा दिली पाहिजे आणि मुक्ताबाई सारखी ज्ञानी असावी. मुलाचे कतृत्व, शौर्य, धैर्य त्यात सामावले असावेत. जसे- शिवाजी महाराज, संभाजी महाराज, झाशीची राणी, महाराणा प्रताप, श्रावण बाळासारखा आई वडिलांची सेवा करणारा पुत्र असावा. मुलगी कोणत्या घरात जन्म घेतात? आजही जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा बहुतेक घरात आणि मित्रपरिवारात निराशा पसरते. हे मानवाचे अज्ञान आहे. मुलगी भाग्यवंताचे घरीच जन्माला येते. ज्यांनी पुण्य कमविले असते अशांचे घरीच मुलगी जन्माला येते. अर्जून श्रीकृष्णाला विचारतात की, कोणत्या कर्मामुळे मुलीचा जन्म होतो? श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्थ जर मुलगा भाग्याने होत असेल तर मुलगी सौभाग्याने होते आणि ज्या स्त्री किंवा पुरुषाने आपल्या मागील जन्मात चांगले कर्म केले असेल त्यांनाच मुलीचे पालक होण्याचे भाग्य मिळते. मुलगा एकच कुटूंब उजळून टाकतो आणि कन्या दोन कुळ उजळून टाकते. हे अर्जूना, ज्या दिवशी मुलीचा जन्म थांबेल तेव्हा त्या दिवशी सृष्टी संपुष्टात येईल. मुलीचा जन्म झाला की, आपल्या घरी लक्ष्मी आली असे आपण म्हणत असतो.
पूर्व जन्मातील कर्मानुसार आपल्याला या जन्मात आई-वडील, भाऊ-बहिण, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, मित्र-शत्रू आणि सगे संबंधी नातेवाईक हेच आपल्या घरी जन्म घेत असतात. कारण आपल्याला काही द्यायचे तर त्यांचेकडून काहीतरी घ्यायचे असते. मागील जन्माची उसनवारी बाकी असते. आपण बघुया की, आपल्या घरी मुलांच्या रुपात कोण जन्माला येतात? संतान रुपात आपल्या पूर्व जन्मातील नातेवाईक जन्म घेत असतात असे शास्त्र सांगते. पुत्राचे चार प्रकार शास्त्रात सांगितले आहे ते पाहू.
१) ऋणानुबंध पुत्रः- मागील जन्मातील असा कोणी जीव ज्यांच्याकडून मागील जन्मी आपण ऋण घेतले असेल किंवा ज्याचे धन आपण नष्ट केलेले असेल असा जीव आपल्या घरात आपले संतान म्हणून जन्म घेतो व आपले धन त्याचा आजारपण किंवा कोणत्याही वायफळ गोष्टीवर खर्च करणे. अशाप्रकारे नष्ट होत राहते. जोपर्यंत त्या जीवाचा संपूर्ण हिशोब क्लियर होत नाही तोपर्यंत असेच चालते.
२) शत्रू पुत्रः- मागील जन्मातील आपला एखाद्या शत्रू त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी आपल्या घरात संतान म्हणून जन्म घेतो आणि मोठा झाल्यावर आपल्या आई वडिलांना मारझोड करतो, भांडण तंटे करतो, त्रास देतो अशाप्रकारे संपूर्ण आयुष्यभर त्यांना त्रासच देत राहतो. नेहमी वाईट बोलून त्यांना दुखी करतो. अपमानित करतो व त्यांचे दुःख पाहून स्वतः आनंदी होतो.
३) उदासीन पुत्रः- या प्रकारचे संतान आपल्या आई वडिलांची सेवाही करत नाहीत व त्यांना त्रासही देत नाहीत. त्याना त्यांच्या परिस्थितीत तसेच राहू देतील. एकदा का विवाह झाला की, अशी मुले आपल्या आई वडिलांपासून वेगळे व दूर राहणेच पसंत करतात.
४) सेवक पुत्रः- मागील जन्मी जर आपण कोणाची खूप सेवा केली असेल तर असा जीव त्यांच्या वरील सेवेचे ऋण फेडण्यासाठी या जन्मात आपली संतान म्हणून जन्म घेतात. आपण जे पेरले असेल तेच तर उगवेल ना. आपण जर आपल्या आई वडिलांची सेवा केली असेल तर म्हातारपणात आपले मुलेमुली आपली सेवा करतील. नाहीतर कोणी पाणी पाजणारेही भेटणार नाही.
असे नाही की, या सर्व गोष्टी मनुष्य प्राण्यावरच लागू होतात. या चार प्रकारात कोणताही जीव असू शकतो. जसे- आपण एखाद्या गाईची निस्वार्थ भावनेने सेवा केली असेल तर ते ही आपला मुलगा, मुलगी म्हणून येऊ शकते. जर तुम्ही एखाद्या गाईला फक्त आपल्या स्वार्थासाठी दुधासाठी पाळले असेल व तिने दूध बंद केले तर त्यानंतर तुम्ही तिला टाकून दिली असेल किंवा सोडून दिले असेल तर तीच तुमची ऋणानुबंध संतान म्हणून जन्म घेईल आणि आपले कर्ज परत मागेल. जर आपण एखाद्या निरपराध जीवाला त्रास दिला असेल तर असा जीव आपल्या जीवनात आपला शत्रू बनून येईल आणि त्याचा बदला घेईल म्हणूनच जीवनात कधीही कोणाचेही वाईट करु नये कारण निसर्गाचा हा नियमच आहे की, आपण जे काही कर्म करतो त्याची परतफेड आपल्याला या जन्मात, काही पुढील जन्मात १०० पटीने अधिक मिळेल. जर तुम्ही कोणाला एक रुपया दिला असेल तर तुमच्या खात्यात १०० रुपये जमा होतील. जर तुम्ही कोणाकडून १ रुपया लुबाडला असेल किंवा घेतला असेल तर तुमच्या खात्यातून १०० रुपये कमी होतील.
विचार करा की, आपण येताना बरोबर कोणते धन आणले होते आणि आपण मेल्यानंतर किती बरोबरच घेऊन जाणार आहोत. जे निघून गेले त्यांनी किती धन, सोने, चांदी, पैसे, घरदार, जमीनजुमला मागे राहिला असेल तर समजावे की ते आपण व्यर्थच कमविले. जर आपली मुले मुली चांगले असतील तर त्यांच्यासाठी काहीही सोडून जाण्याची आवश्यकता नाही. ते स्वतःच कमवून खातील आणि जीवन आयुष्य आरामात जगतील. परंतु जर आपली मुले मुली बिघडलेली व नालायक निघाली तर त्यांच्यासाठी कितीही धन सोडून गेले तर थोड्याच दिवसात आपली सर्व संपत्ती नष्ट करतील. मी माझे, मला आणि ही सर्व धनसंपत्ती इथल्या इथेच राहील. काहीही आपल्या सोबत जाणार नाही. बरोबर काही जाणार असेल तर फक्त आपली चांगली कर्मे, आपले चांगले कर्मे, आपले चांगले वर्तन म्हणून जेवढे शक्य होईल तेवढे पुण्य साठवण्याचे काम करा. चांगले कर्म करा. वाईट कर्मापासून दूर राहून सत्कर्म करा व इतरांची सेवा करा. इतरांकडून सेवा करुन घेऊ नका.
बोधः- एकच पुत्र असावा. अनेक पुत्र असण्यापेक्षा एखाद्या दुःख देणाऱ्या, हृदयाला जाळणाऱ्या, अनेक पुत्रांचा जन्म देण्यात काय फायदा? कुळाला आधार देणारा एकच पुत्र श्रेष्ठ असतो. त्याच्या आश्रयामध्ये कुळसुख उपभोगतो. अशा अनेक पुत्रांचा काहीही लाभ नाही.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....