वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन, राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य दिवसानिमित्त जिल्ह्यात महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र, वाशिम व सामाजिक न्याय विभाग,वाशिम यांच्या संयुक्त वतीने महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र येथे पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. पंधरवड्यात संपूर्ण जिल्हयात व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करण्यात आली. पंधरवडयाचा समारोप 26 जून रोजी प्रभात फेरी काढून व्यसनमुक्ती केंद्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करुन करण्यात आला. यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संतोषकुमार देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण निरीक्षक दिनेश लहाडके उपस्थित होते. सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
अध्यक्षीय मार्गदर्शनातून देशमुख यांनी व्यसनापासून तरुण पिढी दूर राहिली पाहिजे. तरुण म्हणजे उद्याचा उज्वल भारत घडवणारे शिल्पकार असत्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दिनेश लहाडके यांनी सांगितले की, आजच्या परिस्थीतीत आपल्या जीवनामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे व तस्करीचे प्रमाण वाढले आहे. या अंमली पदार्थामुळे संसाराची राखरांगोळी होत आहे. या गोष्टीपासून सर्वांनी दूर राहावे. साई व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने सर्व प्रकारची जनजागृती करण्यात येत आहे. नशामुक्त करण्याचा प्रयत्न या व्यसनमुक्ती संस्थेमार्फत होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
व्यसनमुक्ती संस्थेचे प्रकल्प संचालक राजेश गोटे यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यसनमुक्ती केंद्राकडून सर्व व्यसनांची होळी करण्यात आली.
कार्यक्रमाला अभिषेक गोटे, सचिन खोडे, विनोद जाधव, केशव गमे, संदीप ससाणे, विलास गोटे, यश पवार, अरविंद व्यवहारे, रितेश चव्हाण व प्रज्वल सरनाईक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अमोल देशमुख यांनी केले.