वाशिम:-
सध्या पावसाळी वातावरण तयार झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र दि.20 जुलै 2024 पासून सततधार पाऊस सुरू असून,त्यामुळे मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग,रायगड, गडचिरोली,भंडारा,चंद्रपूर, यवतमाळ,वर्धा,नागपूर येथे पावसाने पुरस्थिती निर्माण झालेली असून नदी,नाले,धरणे तुडूंब भरलेले असून अनेक ठिकाणी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकंदर परिस्थितीमुळे शेतपिकाचे व ग्रामिण भागातील घरादाराचे नुकसान होऊन सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.त्यामुळे रोज मजूरीने कामाला जाणाऱ्या शेतमजूर,बांधकाम कामगार, चाकरमान्यांवर बेरोजगारीच कुऱ्हाड कोसळली असून,शेती पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी राजा हतबल झाला असून तातडीने शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करीत आहे.पावसाचा फटका महामार्ग वाहतुकीलाही बसत आहे.तसेच मुंबई पुणे जाणाऱ्या गाड्यांचे रेल्वे वेळापत्रक बिघडले आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी जिल्ह्यातील ग्राम रुई गोस्ता येथील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांचेकडून शुक्रवार दि. 26 जुलै रोजी भ्रमणध्वनीवरून पावसाचा अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी सांगीतले की. जुलै च्या उत्तरार्धात शेवटल्या आठवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, संपूर्ण महाराष्ट्रातच रिमझिम ते सततधार तसेच काही भागात मुसळधार पाऊस राहणार असून महाराष्ट्रातील धरणाची पातळी सरासरी पेक्षा जास्त होण्याचा अंदाज नाकारता येणार नाही.पुढील महिन्याच्या दि. 06 ऑगष्ट पर्यंत हा पाऊस राहणार असून विदर्भ,मराठवाडा, खान्देश,उत्तर महाराष्ट्र,कोकण,पश्चिम महाराष्ट्रात चांगला मुसळधार पाऊस होऊन महाराष्ट्रातील सर्वच धरणातील जलसाठा पूर्ण होण्याची शक्यता आहे. शिवाय मराठवाडा,पश्चिम विदर्भापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पूर्व विदर्भात यवतमाळ,वर्धा,चंद्रपूर,भंडारा, गडचिरोली,नागपूर इत्यादी जिल्ह्यांत होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. जास्त प्रमाणात पाऊस होऊन नदी नाले तुडूंब भरून वाहण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी पाऊसापासून सुरक्षित राहण्या करीता दक्षता घेण्याचे त्यांनी आवाहन केले असून,पुराचे पाणी असतांना नदी,नाले,पांदण रस्ते,धरण व धबधब्याजवळ जाऊ नये.पुराचे पाण्यामधून आपली दुचाकी किंवा चारचाकी वाहने,एसटी बस,बैलबंडी,जनावरे नेऊ नये.विजा कडाडत असतांना मोबाईल बंद ठेवावेत.मोबाईल फोनचा वापर टाळावा. पावसापासून स्वसंक्षणा करीता शेतातील हिरव्या झाडाचा आश्रय घेऊ नये तसेच झाडांखाली आपली जनावरे,शेळ्यामेंढ्या बसवू नये.असे वृत्त संवादादरम्यान जिल्ह्यातील ग्राम रुईगोस्ता येथील हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी कळविल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगितले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....