वाशिम - जिथे सरकारची जबाबदारी संपते, तिथून सेवाभावी मनाची प्रेरणा सुरू होते. शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असलेल्या तांडे, वस्ती, पालावर राहणार्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा दीप पेटवणारे कार्य येथील महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून निष्ठेने सुरू ठेवले आहे. त्यांचे हे कार्य केवळ शिकवणे नसून, एका पिढीचा अंधार दूर करून जीवनदृष्टी देणारी अध्यात्मिक व सामाजिक सेवा ठरली आहे.
रेल्वे स्थानकाजवळील पालावर दररोज संगीता ढोले त्या मुलांना शिकवत असतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता, आपली नोकरी सांभाळून त्या झोपड्यांमधल्या भवितव्यांना दिशा देत आहेत. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून शासन, प्रशासन आणि अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवले आहे. त्यांच्या कार्यात आपलाही खारीचा सहभाग असावा या उदात्त भावनेतून, हिंदवी परिवार, शिवछत्रपती तरुण मित्रमंडळ व आंबटपुरे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २२ जून रोजी पालावरील मुलांना व महिलांना जीवनोपयोगी व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये महिलांना साड्या, पुरुषांना पॅन्ट-शर्ट, मुलांना शालेय साहित्य, वह्या, पुस्तके व कपडे यांचा समावेश होता. या प्रसंगी योगप्रशिक्षक डॉ. भगवंतराव वानखडे, दिलीप मेसरे, विलास आंबटपुरे, जय आंबटपुरे, राजु सहातोंडे, अजय भोयर, गजानन दहात्रे, संजय हेंबाडे, राजु सैबेवार, सुखदेव राजगुरु, शिंदे, राठोड, शुभांगी ठाकरे, गायत्री वाघमारे, खुशाल खडसे, सरोदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते संगीता ढोले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात डॉ. वानखडे म्हणाले, शासनाच्या योजनेपेक्षा समाजाच्या सजगतेने परिवर्तन घडते. संगीता ढोले यांच्यासारख्या लोकांनी दिलेलं शिक्षण हे फक्त ज्ञान न देता माणूस घडवते. त्यांनी समाजातील सर्व स्तरांतील व्यक्तींना आवाहन केले की, या पवित्र कार्यात आपणही पुढे येऊन खारीचा वाटा उचलावा आणि समाजसेवेच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करावा. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय संगीता ढोले यांनी स्वतः केले. त्यांच्या डोळ्यांतील समाधान, मुलांच्या चेहर्यावरील हास्य आणि उपस्थित समाजसेवकांच्या ओठांवर उमटलेले कौतुकाचे शब्द हेच या उपक्रमाच्या यशाचे खरे मोल ठरले. ही एक सुरुवात आहे. संगिता ढोले यांच्या माध्यमातून पालावर शिक्षणाचा प्रकाश पसरत रहावा आणि समाजातील प्रत्येक पालावरचा दीप अखेरीस उजळलेल्या भवितव्याचा सूर्य ठरावा असे कौतुगोद्गार यावेळी उपस्थितांनी काढले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....