पुणे:- जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या व ध्येय निश्चित करून देण्यासाठी सातत्याने झटणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता,आदर, श्रद्धा व भक्ती व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा या दिवशी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशालेमध्ये पालक शिक्षक संघाच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरुने दिलेले ज्ञान आचरणात आणून, सतत प्रयत्नशील राहा असे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महिलाश्रम हायस्कूलच्या माजी प्राचार्या उमा जोशी यांनी विद्यार्थ्यांना गोष्टीरूपाने संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, स्वागतगीत व प्रतिमा पूजनाने झाली. प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे स्थान खूप मोलाचे आहे. लहानपणीच प्रत्येकाच्या आयुष्याची पायाभरणी गुरुवर्य करीत असतात.त्यांच्यामुळे ज्ञान आणि संस्कार तर मिळतातच, परंतु जीवन जगण्याचा मार्गही ते दाखवतात.या गुरूंनी दिलेल्या प्रकाशाने आपले आयुष्य उजळते म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे असे विद्यापीठ हायस्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रमुख पाहुण्या उमा जोशी यांच्या हस्ते दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केलेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा बक्षीस व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रशालेतील शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, सफाई कामगार,सुरक्षा रक्षक यांचाही यावेळी नारळ व पुष्प देऊन पालक शिक्षक संघ कार्यकारीणीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, आरुणि विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका छाया माळी, शिक्षक प्रतिनिधी संध्या आवेकर, शिक्षकेत्तर प्रतिनिधी अपूर्वा आदलिंगे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गणेश कांबळे, सहसचिव भाग्यश्री मासाळ, प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक शिक्षक संघातील सर्व कार्यकारिणी सदस्य, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार योगिता वेडे यांनी मानले.