सुसा,:- लग्न म्हटलं तर हुंडा, भव्य दिव्य सजावट आणि रोशनाई, डीजे, बँड बाजा, दाग दागिने, पंचपक्वान्न याचा प्रचंड ट्रेंड निर्माण झालेला आहे. यासाठी अतोनात खर्च करण्याची परंपरा पूर्णता रुजली असतानाही चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा या गावात कमीत कमी खर्चाचा सत्यशोधक विवाह सोहळा 28 एप्रिल 2025 ला पार पाडला. या लग्नात आगाऊ खर्च टाळून नवरदेवाने गावातील शिवारस्ते बांधले. तर गावातील आणि इतर नातेवाईकांनी सोबतच मित्रांनी लग्नानिमित्त जोडप्याला झाडांचा आहेर आणण्यात आला.
सुसा गावातील श्रीरंग गणपत एकुडे यांचा मुलगा श्रीकांत आणि यवतमाळातील मोझर या गावचे गोपीकिसन गरमडे यांची मुलगी अंजली यांचा विवाह पार पडला. नवरदेव असलेले श्रीकांत एकुडे हे उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण एम एस सी ऍग्री पर्यंतचे झाले असून ते परिसरातील प्रगतशील शेतकरी आहेत. सोबतच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा विचार केला तेव्हा त्यांची फक्त एकच अट होती. ती म्हणजे लग्न हे नोंदणी पद्धतीने किंवा सत्यशोधक पद्धतीने करायला मुलगी आणि कुटुंब तयार असावे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रगतिशील आणि कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश गरमडे यांच्या मध्यस्थीने हा योग जुळवून आणला. जेव्हा सुरेश गरमडे यांनी प्रस्ताव मुलगी अंजलीच्या वडिलांकडे ठेवला तेव्हा त्यांनी निर्णय घ्यायला थोडा वेळ घेतला. घरच्यांसोबत बोलून त्यांनी होकार कळवला. वधू मुलीची मानसिक कुचंबना करणाऱ्या लग्न जोडण्याच्या पारंपारिक पद्धतीला बाजूला सारत मुला मुलींच्या चर्चा व संवादाच्या माध्यमातून आधुनिक प्रगतशील विचाराने लग्न जोडण्यात आले.
लग्नात कोणताही अवाढ्यव्य खर्च करायचा नाही. हुंडा, भव्य दिव्य सजावट आणि रोशनाई, डीजे, बँड बाजा, दाग दागिने, पंचपक्वान्न या गोष्टी शंभर टक्के टाळायच्या. हेच पैसे सर्वांना उपयोगी अशा ठिकाणी वापरायचे हे दोन्ही कुटुंबाचे ठरले.
*शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केले 2 हजार फूट शिवार रस्त्याचे काम*
पावसाळ्यात शिवार रस्त्यांची अवस्था फारच वाईट होती. शेतकऱ्यांना तर सोडा जनावरांनाही जाणे शक्य होत नाही. म्हणून श्रीकांतने लग्न खर्चातून बचत करत अतिशय अडचणीच्या असणाऱ्या दोन शिवार रस्त्याचे खडीकरण केले. यामुळे आता शिवारातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात सुद्धा ये- जा करता येणार आहे. शेतकऱ्याचे उत्पादनाला योग्य भाव न मिळाल्यामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच असते. तरीपण कर्ज काढून लग्न थाटामाटात करण्याची परंपरा आजही कायम आहे. परंतु या युवा शेतकऱ्याने या परंपरेला बाजूला सारत शेतकरी हिताचाच विचार करत 2000 फुटापेक्षा जास्त लांबीचे शिवार रस्त्याचे खडीकरण केले. यामुळे शेतकऱ्यांना दळणवळण करणे सोयीचे झाले आहे.
*शेतात केली विविध फळझाडांची लागवड*
सत्यशोधक विवाह सोहळा असल्याने आहेर पद्धत ठेवायची नव्हती. आणि नाही कुठल्या कुलर, कपाट, फ्रिज, सोफा, भांडे यासारख्या महागड्या वस्तू सुद्धा हव्या होत्या. परंतु सृजनशील असलेल्या श्रीकांतने सर्व नातेवाईकांसमोर फळझाडं भेटवस्तू स्वरूपात देण्याचा संकल्प बोलून दाखवला. आणि आश्चर्य म्हणजे नातेवाईक आणि मित्रांनी सुद्धा या संकल्पनेला प्रतिसाद देत तब्बल 90 पेक्षा जास्त फडझाड भेट स्वरूपात दिली. यामध्ये 36 प्रकारच्या विविध फडझाडांचा समावेश आहे. विदर्भात पिकत असलेल्या फळझाडासोबतच स्टारफ्रूट, वॉटर एप्पल, चकोत्रा, मलबेरी, लिची, रबर, अशा फडझाडांचा सुद्धा समावेश आहे. तर चारोळी कवट, बेल, मोह या जंगली फळझाडांचा सुद्धा समावेश आहे. सोबतच पावसाळ्यामध्ये विविध वेली, रानभाज्या, औषधी वनस्पती यांची त्या ठिकाणी लागवड करण्याचा संकल्प आहे. यामुळे त्यांचे शेतामध्ये 1600 स्क्वेअर मीटरचे एक फ्रुट फॉरेस्टच निर्माण होणार आहे.
या लग्नाची पंचक्रोशीत सकारात्मक व नकारात्मक चर्चा होत आहे. कर्ज काढून लग्नात वारेमाप खर्च करून स्वतःच भविष्य गहाण ठेवणाऱ्या लोकांसाठी या विवाहाने आदर्श ठेवला आहे. त्यामुळे विवाहाचे कौतुक सुद्धा होत आहे. या समारंभाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
"शेतकऱ्यांनी अगोदर स्वतःचा आणि स्वतःच्या शेतीच्या विकासाचा विचार केला पाहिजे. सरकार किंवा समाजव्यवस्था शेतकऱ्यांचा विचार करत नाही ही वस्तुस्थिती असताना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. म्हणून मी शिवार रस्ते तयार केले. तसेच भविष्यात आपले लोकं जंगलाचं अस्तिव राहील का? जंगली झाडं फळं पुढील पिढीला पाहायला चाखायला मिळेल का? हे माझ्या समोर प्रश्न निर्माण झाले होते. म्हणून मी माझ्या शेतातच नातेवाईकांच्या मदतीने फ्रुट फॉरेस्ट तयार करण्याचं ठरवले. याला ते विरोध करतील पण माझे मित्र आणि नातेवाईक यांनी उत्स्पूर्त प्रतिसाद दिला. याचा मला भरपूर आनंद आहे. यामुळे लग्नसंस्थेत नवीन व्यवस्था निर्माण व्हावी अशी आशा आहे."
--- श्रीकांत एकुडे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....