मानवी समुहातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा.त्याला भौतिक जीवनातील मुलभूत गरजा भागविण्यासाठी सुलभ प्रशासकीय व्यवस्था आणि समृध्द जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी नोकरी,रोजगार,व्यवसायाच्या संधी,श्रमिक कष्टकरी शेतकऱ्यांना पुरेशे आणि अत्यंत सुलभ असे शासकीय,प्रशाकीय सहकार्य मिळावे..., ह्या या देशातील लोकशाही व्यवस्थेमध्ये समाजाला अभिप्रेत असणाऱ्या गरजा आहेत.हे सर्व होत असताना ज्या
ध्येयासाठी तो धडपडतो,स्वतःच्या पारिवारिक जीवनासोबतच सामाजिक विकासप्रक्रियेतून देशाच्या प्रगतीला हातभार लावतो,त्या मनुष्याच्या सुरक्षित जीवनाची हमी देणारी आरोग्यसेवावाहीनी सुध्दा तेवढीच कर्तव्यक्षम आणि नैतिकतेच्या मार्गाने चालणारी असावी. ही एक सर्वात मोठी महत्वपूर्ण आणि उदात्त अपेक्षा मानवी समाजाने गृहीत धरलेली असते.कारण जीवनाची सुरक्षा ही त्यांची प्राधान्यक्रमाची गरज असते.
समाजासाठी मुलाधार असणाऱ्या डझणभर अपेक्षा आपण थोड्या बाजूला ठेऊ.परंतू ज्या अपेक्षांच्या आणि ध्येयाच्या पूर्तीसाठी अस्थिर आणि धकाधकीच्या जीवनात मनुष्य सामाजिक योगदानही देत असतो. समाज आणि देशनिष्ठेची ज्योत हृदयात तेवत ठेऊन तो वाटचाल करीत असतो. परंतू त्यांच्या कष्टाची... निष्ठेची कोणतीही किंमत काही भावनाशुण्य दलालांच्या बाजारात होत नाही हा आजचा सर्वात मोठा वेदनामय आक्रोश आहे...!जे इतरांसाठी जगतात ते देशातील शेतकरी,कष्टकरी,युवाशक्ती आणि श्रमिकांच्या भावनांशी प्रतारणा करून माणूसच माणसाशी कसायासम वर्तन करतांना आढळतो ....तेव्हा हृदयातील एक वेदनाभरीत आर्त हुंकार बाहेर पडतो....आणि तो म्हणतो "माणसा माणसा कधी होशील रे माणूस तू?" असंख्य दिवस गेले.... अनेक वर्ष आणि कितीतरी दशके गेली..... परंतू माणसाच्या शोधात खरी माणसं फक्त बोटावर मोजण्याइतकीच नगण्य मिळाली."माणूस द्या मज माणूस द्या" म्हणणारे राष्ट्रसंत गेले ....! खराट्याने वस्त्या आणि सोबतच हृदयाची आणि विचारांची स्वच्छता सांगणारे समाजसुधारक संत गाडगे महाराज गेले...त्यापूर्वी असंख्य संतांची मांदियाळी ओरडून ओरडून सांगून गेली.....,माणसांना जागविणाऱ्या हाका देऊन गेली.... परंतू तरीही येथील कुऱ्हाडांचे परजीवी दांडे मानवी वंशांच्या खोडावरच आपल्या विकृतीचे आघात करत गेले....!सहन करणारे भेटत गेले आणि ते हरामी नराधम विकृती ओकत राहिले...!
माणसाच्याच कुळात जन्माला आलेल्या माणसांनीच माणसांशी किती बेइमानी करावी ? याची माणूस म्हणवि णाऱ्या स्वार्थांध माणसांना शरम केव्हा वाटेल ?आज राजकारणी समाजकारणाचा बुरखा घेऊन धर्म,जात पंथांच्या वादाचे विद्रोह करीत आहेत.जिथे यांचेच स्वत:चे कुळधर्म हे विसरले तिथे ते स्वतःचे राजकीय वर्चस्व मजबूत करण्यासाठी,सोबतच स्वार्थाच्या तुंबड्या भरण्यासाठी राम आणि हनुमानाची कुळे आणि जन्मस्थानं शोधण्यात लोकांना गुंतवून ठेवत आहेत.या देशातील माणसांच्या बुध्दीचा ताबा घेऊन त्यांनी मंदिरं मस्जिदी आणि खोट्या धर्माच्या दंभाचारात गुंतवून ठेवलेले आहे....! आज येथील प्रशासनातील बहूसंख्य घटक अनैतिकता आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीने बरबटलेले
आहेत.परंतू लोकांच्या जीवन सुरक्षेसाठी प्रस्थापित सर्व शासकीय आणि विशेषत: सरकारी आणि खाजगी आरोग्ययंत्रणांध्ये निर्माण झालेल्या काही कसायांनी समाजातील माणसांचे निर्लज्जपणे शोषण करून त्याला गलितगात्र करून सोडले आहे. खाजगी क्षेत्रातून तर अनेक ठीकाणी जीवाची हमी घेता रूग्णांची निर्लज्जपणे होणाऱ्या प्रचंड लूटमारीच्या व्यथा अत्यंत चिंताजनक बनत चालल्या आहेत.मानवी अवयवांच्याही चोऱ्या करून माणसांचे पशुवत लचके तोडले जात आहेत.....सरकारी आरोग्यसेवेत सुविधा भरपूर आहेत परंतू कर्तव्यदक्षपणे अंमलबजावणी करणा-यांना कर्तव्याचा विसर पडलेला आहे.औषधांचा तुडवडा,सरकारी पगार घेऊन खाजगीमध्ये रूग्णांना नागविण्याच्या दुकाना थाटून बसलेले काही कृतघ्न डॉक्टर्स आपल्या तुंबड्या भरण्यात मश्गूल आहेत.ग्रामीण भागात तर अत्यंत भिषण परिस्थिती आहे.वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत,तरीही लोकांच्या जीवांची पर्वा न करता वरीष्ठ अधिकारी त्यांना सांभाळण्याचे प्रयत्न करून सामाजिक प्रतारणेच्या अनाचारात आणखी भर टाकण्याचे काम करीत आहेत. शहरी आणि भागातील सरकारी दवाखाण्यांमधून गरीब रूग्णांच्या उपचारांमध्ये टाळाटाळ करून त्यांना तिरसट मग्रूर वागणूक देऊन अपमानित करणाऱ्या अनेक उन्मत्त कर्मचाऱ्यांना सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव राहिलेली नाही. या बेताल प्रवाहात प्रामाणिकपणे रूग्णसेवेचे कार्य करणाऱ्या डॉक्टर्स,अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनिय कार्याचे श्रेय सुध्दा मिळू शकत नाही.ही वास्तव सत्य त्यांची खंत असते,आणि ते दु:ख सोबत घेऊनच त्यांना सेवानिवृत्ती कडे जाण्याची घाई झालेली असते."भावनाशुण्य या जगी सहृदयतेचे नावच नाही,अनितीचाच बाजार येथे प्रामाणिकतेला भावच नाही"
गेल्या कोरोनाच्या संकटाला संधी बनवित पशू आणि प्राण्यांचा परजीवावर जगण्याचा रानटी वारसा घेऊन सक्रिय झालेल्या आरोग्य यंत्रणेतील काही अधिकारी,डॉक्टर आणि जेमतेम अर्धवट बुध्दीमत्तेच्या थातुरमातूर डिग्र्यांच्या लॅबवाल्यांनी मानवी समाजाची आर्थिक पिळवणुक केली आहे.माणसांवर आलेल्या संकटाला आपली लॉटरी म्हणून स्विकारत त्याला वाचविण्याच्या प्राधान्यक्रमाऐवजी त्यांचे लचके तोडणारी ही पिलावळ माणूसपणाच्या व्याख्येतील माणसं म्हणण्याच्या लायकीची निश्चितच नव्हती, आणि नेहमीसाठी पण नाहीतच....! हे महाराष्ट्रातील जनतेने स्वतःवर आलेल्या संकटावरून आणि यापूर्वीही वारंवार तपासून घेतलेले आहे. म्हणून आरोग्यक्षेत्रातील या अनाचारी उद्रेकाला पाहून आरोग्यसेवा की मेवा मिळवून देणारी राखिव कुरणे? यातील सेवा हा शब्द मानवी नीतिमुल्ल्यांना कमीपणा आणणारा आहे...एवढा मोठा उदात्त शब्द घेऊन वाटचाल करण्याची पात्रता आरोग्यविभागाने अगोदर सिध्द केली पाहिजे...तरच त्यांना तो शब्द वापरण्याचा अधिकार राहिल.
आज शासनात बसलेल्या व बाहेर असलेल्या अनेक राजकीय नेत्यांना व प्रशासनातील त्यांच्या असंख्य दलाल अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या कर्करोगाने ग्रासलेले आहे.परंतू त्यातून शिक्षण आणि आरोग्याच्या सेवाक्षेत्रातही प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे मतलबी खवय्ये जेव्हा निर्माण होणे ही गंभीर प्रकार येथील माणसांची आयुष्ये उध्वस्त करणारी आहेत. पैसा नसणे हा शाप असलेल्या आणि पैशेवाल्यांचेही जीव सुरक्षित असण्याची कोणतीही खात्री देता येत नाही.आज अनेक मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलमधून रूग्णांसाठी आणलेली औषधे शंभर पट महागाईने त्याच्यावर लादली जातात.अव्वाच्या सव्वा प्रचंड बिले काढली जातात.नंतर सामाजिकतेचे खोटे प्रदर्शन करीत कुणाच्या सांगण्यावरून अगोदरच भरमसाठ वाढविलेल्या बिलामध्ये ५-१० टक्के रक्कम कमी केल्याची मेहरबानी दाखविली जाते.रूग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी मेलेल्या माणसांनाही भरती करून घेणाऱ्या भावनाशुण्य लोकांची पितळे अनेक शहरांमध्ये उघड झालेली आहेत.
मसणातील अशा उदांचे प्रताप पाहता आज दिवंगत संत आणि महापूरूषही "हेची फळ काय मम तपाला" म्हणून अश्रू ढाळत असतील. परंतू अनैतिकतेची पातळी ओलांडून मानवी भावभावनांचे सौदे करणाऱ्या असंवेदनशील दलालांना यांचा यत्किंचितही स्पर्श होत नाही.कारण ते गेंड्याची कातडी पांघरलेले सौदागर समाजाचे तारक नव्हे तर मारक म्हणूनच अनेक कुकृत्त्यातून सिध्द झालेले आहेत.अशा या बांधिलकी विसरलेल्या लोकांच्या कोरोना काळातील बेशरम कुकृत्यांना आम्ही सोशल मिडीया आणि वृत्तपत्रांमधून वाचा फोडून जागृती करण्याचे प्रयत्न केले.अशा समाजविघातक प्रवृत्तींना पूर्ण वठणीवर तर नव्हे, परंतू त्याला पायबंद घालून सुधारणा घडवून आणण्याकरीता तक्रारींव्दारे समोर येणारांची संख्या या समाजात नगण्य आहे. म्हणून अनैतिकता,भ्रष्टाचाराने लोकांचे जीवन संकटग्रस्त करून ,आर्थिक लूटमार करणारी ही भ्रष्ट जमात आपल्या मजबूत वस्त्या बनवून अघोरी आनंदाने नांदत आहे.
काही वर्षांपूर्वी चित्रलेखा मासिकातून या काळ्याकुट्ट साम्राज्यावर प्रहार करणाऱ्या एका विशेष लेखाने या बरबटलेल्या यंत्रणेचा पर्दाफाश केला होता.तो पंधरा वर्षांपूर्वीचा लेख अजूनही आठवतो..."पांढऱ्या डगल्याआड दडलेले काळे यमदुत" हा तो स्पेशल रिपोर्ट होता. अकोल्याच्याही वैद्यकीय क्षेत्रात आज अनेक लूटारू मनोवृत्तीचे काही विघातक घटक सक्रीय आहेत.समाजाला अशांच्या फसवणूकीच्या मनोवृत्तीचे कारनामे उघडी पाडायचे असतील आणि जागृती घडवून स्वतःलाही वाचवायचं असेल तर जरा विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत. चुकीची औषधे आणि अयोग्य उपचार करणारांपासून सावध राहिलं पाहिजे..!,कमिशन बाजीच्या भ्रष्ट साखळीतून पोसलेल्या रूग्णांच्या चुकीच्या तपासण्या करणाऱ्या काही अनधिकृत आणि अपात्र लॅबवाल्यांकडूनच चाचण्यांचे रिपोर्ट आणण्याच्या काही डॉक्टरांकडून केल्या जाते.अशा मतलबी सुचनांना नाकारून प्रतिबंध केला पाहिजे.तपासणी केलेल्या डॉक्टरांनी निदान योग्य केले की नाही की फक्त उपचारांची रक्कम उकळण्यासाठी भावनिक दडपण आणणाऱ्या भितीचा अवलंब केला,हे तपासण्यासाठी दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी अजून पैशै खर्च करण्याची तयारी ठेवली पाहिजे.ज्या ज्यावेळी असे उलटतपासण्याचे प्रयत्न झालेले आहेत,त्या त्यावेळी तपासण्यातील निदान आणि लॅबच्या चाचण्यांमध्ये तफावत असल्याचे सिध्द झालेले आहे.म्हणून कमीशनबाजीच्या साखळी पध्दतीतून रूग्णांना लूबाडणाऱ्या या भ्रष्ट,विश्वासघातकी मनोवृत्तींपासून आपले, कुटूंबियांचे आणि समाजाचे जीवन सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न करणे हे दक्ष पहारेकऱ्याचे लक्षण ठरते.कारण बेसावध राहणे...परमेश्वर म्हणून विश्वास टाकणे हा अंधविश्वास जीवाचा खेळ करणारा ठरू शकतो.आरोग्यक्षेत्रात अनेक कर्तव्यदक्ष आणि आरोग्यसेवेची बांधिलकी जपणारे प्रामाणिक डॉक्टर्स पण आहेत.परंतू येथे सक्रीय झालेल्या भ्रष्ट लोकांनी शासकीय आणि खाजगीसह अवघ्या आरोग्य यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.म्हणून उपचारासाठी योग्य ठीकाणाचीच चौकशी केली पाहिजे .शांततेने निर्णय घेऊन त्यासाठी विधायक लोकांची मदत आणि प्रसंगी योग्य तो सल्ला घेतला गेला पाहिजे.
पंधरा वर्षांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये माझ्या गावातील रूग्णाची अॕपेंडिक्सची शस्त्रक्रिया फक्त १५ हजारांत झाली,त्याच एक दोन दिवसात गावातील दुसऱ्या एका रूग्णाची तेथून दोन मिनीटाच्या या अंतरावरील हॉस्पिटलमध्ये तिच शस्त्रक्रिया ३० हजारांत झाली.माझ्या शेजारच्या एका रूग्णांच्या नातेवाईकाला त्याच्या आजोबांची शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगण्यात आले होते.तोच रूग्ण जेमतेम १५० रूपयांच्या औषधांमध्ये दुरूस्त झाल्याचं त्याने मला एक महिन्याने सांगीतलं.....येथे भावनिक दडपणाखाली घाई करून नुसत्या सोनोग्राफीच्या रिपोर्टवर रूग्णाला त्याच्या मनाविरूद्ध ऑपरेशनच्या टेबलवर घेणारे काही पैसापिपासू डॉक्टरही सक्रीय आहेत......एकाची शस्त्रक्रिया झाली पोटातून गोळा काढण्यात आला.सहा महिन्यात परत त्रास झाला म्हणून मुंबईला गेला. बिचाऱ्याला परत शस्त्रक्रिया करावी लागली.तिथे सांगण्यात आले पहिल्या गोळ्याचा अंश ठेवला गेला म्हणून हे परत उद्भवले .आता अंश का राहीला?काय डॉक्टर अप्रशिक्षित होते की लुटण्यासाठी परत आला पाहिजे म्हणून ठेवण्यात आला? यांचे समर्पक उत्तर कधीही मिळणार नाही.महिलांच्या गर्भपिशव्यांच्या शस्त्रक्रिया ह्या गरजा नसतांनाही झालेल्या आहेत.ज्यांच्यासोबत ह्या घटना घडलेल्या आहेत, ते अनेक पिडीत माझ्या नियमित संपर्कातील आहेत..आम्ही जागृतीसाठी या विषयावर बोलतो.ह्या घटना अनेक लोक आमच्याकडे सांगून जातात. परंतू लेखी तक्रारी द्यायला समोर येणारांची संख्या कमी असते.म्हणून हताशपणे ही अनैतिकता,लूटमार,आणि वरून मग्रूरी सुध्दा सहन करण्यावाचून समाजापुढे पर्याय उरत नाही.एखाद्या प्रकरणात तक्रार होऊन न्यायालयापर्यंत गेलेही तरी वैद्यकीय क्षेत्रात स्पष्टीकरणाच्या अनेक पळवाटा आहेत.त्या न्यायालयासमोरही पटवून दिल्या जातात आणि त्यातून आरोग्यसेवेचा खोटा बुरखा पांघरलेले आणि त्याआडून पापाचा मेवा कमावणारे असे गल्लेभरू मनोवृत्तीचे लोक बिनबोभाट निर्दोष सुटतात....! कायद्यापलिकडे काही गडबड केलीच तर शासनाकडून प्रदान करण्यात आलेलं सुरक्षेच्या कायद्याच्या हत्त्याराचं वरदान आहेच....! अशा वरदानांनी वैद्यकीय क्षेत्रातील प्रामाणिक लोकांचं संरक्षण व्हावं त्याबाबत दुमत नाही.परंतू वरदानाने त्यांचे भस्मासूर होऊ नयेत.त्या वरदानाचा घेतलेल्या गैरफायद्याने उन्मत्त होत बेइमानी लूटमार आणि अनैतिकतेचा प्रवाह कर्करोगासारखा अधिक पसरत जाऊ होऊ नये....तुर्त एवढेच...!
शब्दांकन:-
संजय एम.देशमुख,जेष्ठ पत्रकार
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष-लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ,अकोला
मोबाक्र:- ९८८१३०४५४६
आपल्या प्रतिक्रिया द्या....