वाशिम : यंदा आपण अतिशय तप्त उन्हाळ्याचा सामना केलाय. प्रचंड उकाड्याने मानवालाच काय पशु पक्षांना सुद्धा आजच्या काळात जगणे कठीण होऊन बसले आहे.याला कारण म्हणजे आपण मानवांनीच प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करून पर्यावरणाचा केलेला ऱ्हास हे आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे इमारती करीता जंगले-शेती कमी होऊन निवासी भूखंडावर वृक्षतोड होऊन इमारती उभ्या रहात आहेत.रस्ते महामार्ग रुंदीकरणा करीता अमर्याद प्रमाणात मोठमोठी वटवृक्ष, पिंपळ,चिंच,कडूलिंब,आंबा, शिसम,सागवानाची झाडे तोडली आहेत.त्यामुळे पर्यावरणातील ओझोनचा थर,ऑक्सिजन (प्राणवायू) कमी होत आहे. परिणामी दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढतच आहे.दोन वर्षापूर्वी कोव्हिड 19 कोरोना महामारी काळात आपण पाहिले व प्रत्यक्ष अनुभवले की,प्रत्येक रुग्नाला कृत्रिम ऑक्सिजन देण्याची वेळ आलेली होती. आणि त्या परिस्थितीत,कृत्रिम ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा येत असल्याने देशात व देशाबाहेर माणसं ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडत होती.त्यामुळे अशा संकटाचा मुकाबला करण्याकरीता निसर्गासारखा मित्र नाही.त्यामुळे यंदा पावसाळ्यात सर्वांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनावर जास्तितजास्त भर देऊन वृक्षारोपणाला महत्व दिलं पाहिजे.त्याशिवाय आषाढी वारी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर , इतर तिर्थक्षेत्रावर किंवा पर्यटनाकरीता जातांना विविध वृक्षाच्या बिया, निंबोळ्या,आंब्याच्या कोयी, दामोटे,चिंचोके व मिळेल त्या झाडाच्या बिया नदीनाल्यांच्या काठावर,डोंगर,दरी इत्यादी ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच जास्तित जास्त बिजावरोपण करा. तिर्थक्षेत्रावर गेल्यावर प्रदुषण होणार नाही याची काळजी घेऊन प्लॉस्टिक पन्न्या,पॉलिथीन ऐवजी वृत्तपत्राच्या रद्दी पेपर कागदाचा उपयोग करा. बिसलेरी पाण्याच्या बाटल्या वापरानंतर टाकून न देता परत आणून भंगारवाल्याकडे द्या.आपल्याकडून तिर्थक्षेत्र किंवा पर्यटनस्थळाचे पावित्र्य राखा. तेथे कचरा घाण होणार नाही याची दक्षता घ्या.जेणेकरून नैसर्गिक पर्यावरणाचा तोल राखण्यास आपला खारीचा वाटा म्हणून मदत होऊ शकेल. असे आवाहन महाराष्ट्र हरितसेना (वनविभागाचे) आजिवन सदस्य तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.