श्री संत नथ्थुबाबा मोझरकर महाराज यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात मोझर ईजारा या गांवी २६ फेब्रुवारी १९०२ रोजी झाला. मोझरकर महाराज यांचे वडील शिवाजी बाईस्कार मूळचे राजापूर ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती येथील होते. त्यांनी मोझर ई. येथे १७ एकर जमिन विकत घेतली व शेतीवाडी करु लागले. नथ्थुजीचे शिक्षण घुईखेड ता. चांदूर रेल्वे जि. अमरावती येथे ६ व्या वर्गापर्यंत झाले. नथ्थुजीने पंधरावे वर्षी शाळा सोडल्यावर तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवताचा अभ्यास केला. शेतीचा शेतसारा थकल्यामुळे शेती हर्रासात गेली. मोझर ई. पासून २४ किमी. अंतरावर असलेल्या तपोनेश्वर हेमांडपंथी महादेव देवस्थान येथे ७ दिवस अन्नपाण्या शिवाय नथ्थुजीने तपश्चर्या केली. सच्चिदानंद खटेश्वर महाराज यांचे परम् शिष्य श्री रामखटेश्वर महाराज हे नथ्थुजीला सद्गुरु भेटले. काही दिवस नथ्थुजींनी श्री खटेश्वर संस्थान, जोडमोहा ता.जि. यवतमाळ येथे सेक्रेटरी पदाचा कारभार सांभाळला. श्री संत मोझरकर महाराज आध्यात्मिक ज्ञानाचे भरवशावर खेडोपाडी प्रवचन करायला लागले.
१९४१ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भेट संत मोझरकर महाराज सोबत झाली. संत मोझरकर महाराज यांचे एकनाथी भागवत सप्ताह गावोगावी व्हायचे. या सप्ताहातून येणारे दान घर खर्चाचे उपयोगी पडत असे व यावरच कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत असे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी बोरगांव ता.जि. यवतमाळ येथे संत मोझरकर महाराज यांचे एकनाथी भागवत ऐकले. संत मोझरकर महाराज एकनाथी भागवत सांगताना ग्रामगीता व राष्ट्रसंताचे भजनातील संदेश जनतेपर्यंत पोहचवायचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असताना गुरुकुंज मोझरी आश्रमात संत मोझरकर महाराज संचालक मंडळात होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी बरेचसे गांवी मोझरकरांचे एकनाथी भागवत सप्ताह लावून दिलेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९६९ साली गुरुकुंज मोझरी येथे एकनाथी भागवत सप्ताह ठेवला व राष्ट्रसंतानी सात दिवस बसून संपूर्ण भागवत ऐकले. गुरुवर्य तुकारामजी दादा गिताचार्य यांनी अड्याव टेकडी येथे एकनाथी भागवत सप्ताह ठेवला व सातही दिवस ऐकले. संत मोझरकर महाराज यांचे २४६ गावांना ५८८ एकनाथी भागवत सप्ताह झालेत. संत मोझरकर महाराजांचे संपूर्ण महाराष्ट्रात एकनाथी भागवत सप्ताह व्हायचे. संत मोझरकर महाराज यांचे शेवटचे भागवात १९८९ साली श्री वानखडे तहसिलदार, मलकापूर यांचेकडे झाले. वयोमानानूसार महाराज थकले. भागवत करणे बंद पडले. फाल्गुन शुद्ध सप्तमी ३ मार्च १९१० ला सायंकाळी ४ वाजता त्यांची प्राणज्योत अनंतात ब्रम्हस्वरुपी लीन झाली.
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुदामदादा सावरकर लिखीत जीवनयोगी ग्रंथात म्हणतात की, संत मोझरकर महाराज आपल्या प्रवचनाद्वारे अत्यंत मार्मीकपणे जनमताचा ठाव घेऊन लोकभाषेतून अध्यात्म विवेचन करणारे सत्पुरुष आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज १९६७ च्या विशाल सभेचा समारोप भाषणात बोलताना म्हटले होते की, "मनुष्य अधिक लिखापढा न होने पर भी अच्छा प्रचार कर सकता है । नथ्थुबुवा मोझरकर अकेला अनपढ आदमी, परंतु शिर्डी के नजदीक उसने अपने प्रचारद्वारा हजारो लोगो में अच्छी जागृती पैदा की । खूनी और चोर भी प्रभावित हुऐ । ऐसे दस पाँच नथ्थुबुवा मोझरकर यदी हर प्रांतमें घुमने लगे तो कितना प्रचार हो सकता है? इस प्रचार के पिछे त्याग और तप हो तो क्या नही बन सकता ।"
संत मोझरकर महाराज मनुष्य जन्माचा मुख्य हेतू कोणता? हे समजावून सांगताना म्हणतात की, मनुष्य जन्म निर्माण करण्याचा परमेश्वराचा मुख्य हेतू कोणता तर "निजात्म प्राप्ती लागोनी । देवे दिधली मनुष्य योनी ।।" हा विषय संत मोझरकर महाराज एकनाथी भागवतातून पटवून देत असे. ही निजात्मप्राप्ती म्हणजे आत्मज्ञान होय आणि वैराग्यशील, त्यागी पुरुषांवर गुरुकृपा झाल्याशिवाय हे आत्मज्ञान प्राप्त होत नाही. गुरुकृपा होण्याकरिता "तनु, मनु, जीवे चरणासी लागावे । भगवंता करावे दास्य सकळ ।।" याप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे. तसेच ब्रम्हज्ञान संपन्न गुरु मिळण्याकरिता सत्संग आणि संत दर्शनाच्या योगाची गरज आहे. असा योग केव्हा येतो?
निष्कामता निजदृष्टी, अनंतपुण्य कोट्यानुकोटी।
रोकडी लाभे पाठोपाठी, तै होय भेटी हरिप्रियाची ।।
संत मिळण्याकरिता नामचिंतन, नामस्मरणाची नितांत गरज आहे. ते नाम शेवट पर्यंत टिकवावे लागेल तरच त्याचे फळ परमात्म प्राप्ती, आत्मज्ञान संपन्नता होईल. जसेः- सुरुवातीला बी पेरले व त्यापासून वृक्ष बनतो. बीजाशिवाय वृक्ष बनत नसतो. त्या वृक्षाला शेवटी बीजच येणार, बीजानंतर वृक्षाला काहीही येत नाही म्हणजे सुरुवातीला बी आणि अखेरही बी. नामस्मरण हे बीजरुप होय. संत तुकाराम महाराज म्हणतात.
बीज आणि फळ हरीचे नाम ।
सकळ पुण्य सकळ धर्म ।।
बीज आणि फळ म्हणजे सुरूवातीला नाम न शेवटी नामच. सर्व पुण्याचं कारण नाम आणि तसेच सर्व कला प्राप्त करण्याच वर्मही नामातच आहे. जीवाच्या उद्धाराकरिता अखंड नामस्मरण करणे आवश्यक नव्हे तर आपले मनुष्य जन्मातील ते परम् ध्येय होय. नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताच परमार्थाचा अभ्यास नाही. मनुष्य जन्म हा आपणास महत् प्रयासाने मिळाला आहे. नामस्मरण हेच आपले मुख्य ध्येय आहे. जीवाला या संसाराच्या कचाट्यात अहोरात्र गुंतून पडल्यामुळे परमार्थ साधण्यास वेळ मिळत नाही. नामस्मरण हे प्रापंचिक कार्य करीत असतानाही घेण्याजोगे आहे.
नच जाई तिर्थधामा, बस रे करीत कामा ।
कामात लक्ष रामावरी, ठेव अंतरीचे ।।
अशाप्रकारे श्री संत मोझरकर महाराज यांनी एकनाथी भागवताच्या माध्यमातून पटवून दिले. अंतःकरण पूर्वक नामस्मरण करणाराचा अधिकार फार मोठा असतो. आपण सर्वजन परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करु या.
मुखी नाम करी काम, जो रंजल्याचे ।
सदाचरण स्पर्श हो, मला नित्य त्याचे ।।
हम चाहते ऐसी दुनिया हो ।
मुख राम में हो, कर काम में हो ।।
*पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर*
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....