ब्रम्हपुरी: येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत नवप्रवेशित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन” करण्यात आले आहे. सदर इंडक्शन प्रोग्राममध्ये “आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षा” या महत्वपूर्ण विषयावर ब्रम्हपुरी नगरीतील प्रसिध्द शल्यविशारद डॉ. लक्ष्मीकांत लाडुकर यांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आरोग्य म्हणजे आजाराचा अभाव नसून मानसिकदृष्टयादेखील निरोगी असणे आवश्यक असल्याचे सांगितले. सध्या स्पर्धा प्रचंड प्रमाणात असल्याने विद्यार्थी नेहमी अभ्यासाच्या तणावात दिसतात. तणावाचा दुष्परीणाम शरीरावर होऊन विविध मानसिक व शारीरीक व्याधी जडू नये यासाठी विद्यार्थ्यांनी तणावरहीत अभ्यास करावा व यशस्वी अभियंते व्हावे असा मौलिक सल्ला यावेळी दिला. नियमित व्यायाम, चौरस आहार आणि तणावरहीत राहणीमान या त्रिसुत्रीचा अंगीकार केल्यास आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची गरजच मूळी भासणार नाही. तरुण पिढीने मोबाईलचा अतिवापर टाळून उत्तम ग्रंथांचे वाचन करावे आणि आपले जीवन यशस्वी करावे असे सांगितले. मार्गदर्शन सत्रानंतर प्रश्नोत्तराच्या सत्रात उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांना आदर्श व्यक्ती आणि संघर्ष यावर विचारले असता त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारखे महापुरुष विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या वयानूसार वागावे भविष्याची जास्त चिंता करु नये असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. डी.एन. शिंगाडे होते. त्यांनी आपल्या शाळेचे बॅचमेट असलेल्या डॉ. लाडुकरांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आणि जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रामाणिक कष्ट आणि जिद्द याशिवाय पर्याय नाही असे सांगितले. यावेळी इंडक्शण प्रोग्रामचे समन्वयक तथा विभागप्रमुख डॉ. डी. के. पर्बत यांच्यासह जिमखाना उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र राचलवार व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहसमन्वयक प्रा. नितीन पोटे, आभारप्रदर्शन प्रा. विकास चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रदिप नंदनवार, रोशनी लोखंडे, सौरभ देशपांडे आणि सुरेश गजभिये यांनी प्रयत्न केले.