वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : "माझी माती माझा देश"अभियानांतर्गत कारंजा तालुक्यातील ऊंबर्डाबाजार येथे आज जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षदिंडी काढुन अमृत रोपवाटिका तयार करण्यात आली.यावेळी श्रीमती बुवनेश्वरी पालखी खांदयावर घेऊन वृक्षदिंडीत सहभागी झाल्या.
सुरुवातीला जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांच्या हस्ते ग्रामपंचायतने तयार करण्यात केलेल्या शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले.श्रीमती बुवनेश्वरी यांनी वृक्षदिंडीत पालखी खांद्यावर घेतल्याने गावकर्यांचा उत्साह वाढविला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी हातामध्ये टाळ घेऊन वृक्षदिंडीतील राष्ट्रिय भजनाच्या ठेक्यावर ताल धरल्याचे दिसून आले. त्यामुळे गावकरी आनंदीत झाल्याचे दिसून आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे, सरपंच राज चौधरी,उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे,गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड ,सहायक गट विकास अधिकारी कैलास घुगे, विस्तार अधिकारी संजय भगत,मनोज रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
"माझी माती माझा देश" या अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या अमृत रोपवाटिकेमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध प्रकारच्या फुलांची व देशी झाडे लावण्यात आली.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.शाळेतील मुला-मुलींशी त्यांनी संवाद साधला. तसेच गावातील विकासकामांचे कौतुक करतांना युवा सरपंच राज चौधरी यांचे व गावकऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.कार्यक्रमाचे संचालन वर्षा ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक व आभार ग्राम विकास अधिकारी जयकिसन आडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजू बोडे,अरुण इंगोले,सुधाकर हळदे, अ.वहीद,अशोक उघडे,अशोक नेमाडे, गजानन महाराज भजनी मंडळ,सोपिनाथ भजनी मंडळ येवता यांच्या सदस्यांनी,आशाताई, अंगणवाडी सेविका आणि बचत गटाच्या महिलांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाला गावकऱ्यांची उल्लेखनिय उपस्थिती लाभली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....