महाविद्यालयातील प्राध्यापक संवर्गात समाविष्ट असलेले ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्यासाठी शासन निर्णय काढावा यामागणीसाठी पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर २ जून रोजी एकदिवसीय लक्षवेधी उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाने दिला आहे.
नॅक मुल्यांकन व इतर मुल्यांकन समितीच्या दृष्टीने महाविद्यालयात कायमस्वरूपी ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक ही पदे असणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. ग्रंथालय हे महाविद्यालयाचा आत्मा समजला जातो. महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यात ग्रंथपाल महत्वाची भूमिका बजावत असतो. राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याची जबाबदारी ही उच्च शिक्षण संस्थामधील महाविद्यालयात घडत असते. विद्यार्थ्यामध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण करून दर्जेदार खेळाडू निर्माण करण्याची जबाबदारी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक पार पाडत असतात. मात्र महाविद्यालयातील एवढे महत्वाचे ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक ही पद चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी २७ जून २०२१ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आठ दिवसात पदभरतीचा शासन निर्णय काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र एक वर्ष होत आले तरी अद्याप त्यावर कसलीच कारवाई झालेली नाही.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ च्या वतीने २ जून रोजी पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर शासनाचे या महत्वाच्या विषयाकडे लक्षण वेधून घेण्यासाठी एकदिवसीय लक्षवेधी उपोषण करण्यात येणार आहे. तसेच याची तात्काळ दखल जर शासनाने घेतली नाहीतर आम्ही याच कार्यालासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
३०० जागा रिक्त –
राज्यातील अनुदानित वरीष्ठ महाविद्यालयात जवळपास ३०० ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांची पदे रिक्त आहेत. शासनाला फक्त ३०० पदे भरण्यासाठी काय अडचण येत आहे. भरती प्रक्रिया बंद असल्याने महाविद्यालयाचा दर्जा खालावत आहे तसेच पात्रताधारकांना अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे तात्काळ ही पदे भरण्यासाठी शासन निर्णय काढावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने केली जात आहे.