चंद्रपूर : मुंबई येथे मातोश्री समोर हनुमान चालीसा पठणावरून आज शनिवारी (23 एप्रिल) मुंबईत राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यात उदभवलेल्या वादाचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यात उमटले आहेत. जिल्ह्यातील राजूरा येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयावर आज शनिवारी रात्री नऊच्या सुमारास शेकडों शिवसैनिकांनी हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली आहे.
चंद्रपूर जिल्हयातील राजूरा येथे श्रीराम कॉम्पलेक्समध्ये युवा स्वाभिमाना पार्टीचे कार्यालय आहे. मुबंई येथे राणा दाम्पत्य व शिवसेनेमध्ये मागील दोन दिवसांपासून हनुमान चालीस पठण करण्यावरून वाद सुरू आहे. मुंबई येथील वादाचे पडसाद आज शनिवारी राजुरा शहरात उमटले आहेत. रात्री नऊच्या सुमारास शेकडों शिवसैनिकांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयावर हल्हा केला.
कार्यालयासमोरील पार्टीच्या फलकाची तोडफोड केली आहे. पहिल्या माळ्यावरून आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे फोटो असलेले फलक खाली फेकून तोडफोड केले.त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या जिल्हाध्यक्ष विरोधात तक्रार दाखल केली आहे.