जैनांची काशी आणि भारत देशातील दत्त उपासक गुरुभक्तांचे माहेर असलेले श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराजांची जन्मभूमि असणारे कारंजा शहर ऐतिहासिक धार्मिक परंपरा असणारे शहर तर आहेच. त्याशिवाय संपूर्ण भारतातील पहिली बाजारपेठ म्हणून स्थापन झालेल्या देशातील पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे शहर आहे. येथील सर्वधर्मिय हिंदू मुस्लिम यांच्या शांती व सलोख्यामुळे शांतताप्रिय शहर म्हणूननही या शहराचा नावलौकीक आहे. येथील माध्यमिक शाळा शिक्षणक्षेत्रातील गुणवत्तेबद्दल अमरावती विभागात सुप्रसिध्द आहेत. त्यामुळे येथे नोकरीला येणारे अधिकारी कर्मचारीही येथे स्थायीक झाल्याचे वास्तव आहे. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंचाहत्तर वर्ष होऊनही हे शहर विकासापासून अद्यापपावेतो कोसो दूरच राहीलीले आहे. या शहरात उत्कृष्ट माध्यमिक शाळा असल्या तरीही उच्च शिक्षणाची मात्र कोणतीच सुविधा होऊ शकली नाही. बहुजन समाजा करीता सामाजिक न्याय भवनाची स्वतंत्र इमारत नाही. शासनाचे सांस्कृतिक भवन नाही. येथील नागरीकांच्या रोज मजूरीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून औद्यागिक वसाहत (एमआयडीसी) नाही. त्यामुळे कोणतेच शेकडो मजूरांना मजूरी देता येईल असे उल्लेखनिय उद्योगधंदे, कारखाने नाहीत. लोकसंख्येने शहर वाढले असले तरी जुन्या शहरात सर्वच रस्ते रखडलेले व खडुयाचे आहेत. सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नाही. नगर पालिकेच्या मालकीच्या जागाचा (जुना नगर पालिका मानवी दवाखाण्याची जागा अब्जावधी रुपयांची जागा असतांना) या जागेवर परत दवाखाना उभा राहू शकलेला नाही. स्थानिक नगर पालिकेची शेकडो वर्षाची इमारत मोडकळीस आलेली असतांना इमारतीत त्यांच्याच कार्यालयांना जागा नाही. पाच ते सहा वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या जिवन प्राधिकरणच्या टाक्या अपूर्णावस्थेत आहेत. तसेच पाच सहा वर्षापूर्वी टाकण्यात आलेली पाईप लाईन सुरु होऊन नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला नाही. नगर पालिकेचे महावीर बालोद्यान परत सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे लहान मुले किंवा वयोवृध्दांसाठी विरंगुळा म्हणून जवळपास बगीचे नाहीत. प्रत्येक चौका चौकात केरकचऱ्याचे ढिग दिसून येतात . शहरात बाजारपेठ किंवा दवाखाण्यात होणारी गर्दी वाहतुकीला खोळंबा निर्माण करते. तसेच चौका चौकात स्वच्छतागृहे / स्त्री पुरुषांच्या मुत्रीघरांची व्यवस्था नसल्याने आया बहिणींची कुचंबना होत असते.एकंदरीत या शहराला विविध समस्यांचा विळखा असल्यामुळे कारंजा शहराचा विकास खुंटलेला आहे व त्यामुळे शहर भकास दिसून येत आहे. त्यामुळे या शहराचा विकास केव्हा होणार असा प्रश्न स्थानिक मतदारांना पडला असल्याची खंत ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी व्यक्त केली आहे.