वाशिम - विना परवानगी व नियमाविरुध्द गतीरोधक रस्त्यावर टाकल्यामुळे स्कुटीवरुन उसळून महिला जबर जखमी झाल्याची घटना सोमवार, २५ नोव्हेंंबर रोजी स्थानिक केंद्रीय शाळेमागील उंडाळ ले-आऊट मध्ये घडली. अपघात घडला त्यावेळेस महिला उसळून सिमेंट रस्त्यावर पडल्यामुळे महिलेच्या मेंदुला मार लागल्यामुळे महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सिटी स्कॅनमध्ये निदान झाले. त्यामुळे विनापरवानगी व नियमाविरुध्द गतीरोधक रस्त्यावर टाकून माझ्या पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप महिलेचे पती अंबादास सिताराम कांबळे यांनी २९ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी तक्रारीत केला आहे.
तक्रारीत नमूद केले आहे की, अंबादास कांबळे हे उंडाळ ले-आऊटमध्ये धिरेंद्र देवास यांच्या घरात पत्नी, मुलगा व मुलीसह भाड्याने राहतात. त्यांच्या घराला लागुनच सिमेंटचा रस्ता आहे. या रस्त्यावर कुणीतरी नुकतेच विनापरवानगी व नियमाविरुध्द गतीरोधक बांधले होते. त्याच दिवशी रात्री साडेनऊ वाजता अंबादास कांबळे हे पत्नीसह स्कुटीवर बाहेरुन घरी जात असतांना रात्रीच्या अंधारात गतीरोधक दिसले नसल्यामुळे त्यांची स्कुटी अचानक गतीरोधकावरुन उसळली व त्यांच्या मागे बसलेली त्यांची पत्नी सौ. उज्वला कांबळे ही स्कुटीवरुन जोरात खाली पडली. व तिच्या डोक्याला व अंगाला जबर मार लागला. या अपघातात सौ. उज्वला ही जागीच बेशुद्ध पडली होती. अंबादास कांबळे यांनी पत्नीला लगेच डॉ. सागर दागडीया यांच्या हॉस्पीटला नेले असता डॉक्टरांनी सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिल्यावरुन कांबळे यांनी वाशिम सिटी स्कॅन सेंटरमध्ये पत्नीचे सिटी स्कॅन केले. या अहवालात सौ. उज्वलाच्या मेंदुवर सुजन आल्याचे निदान झाले. अपघात झाल्यानंतर सौ. उज्वला ही वेड्यासारखी बडबड करत होती. तीच्या पुढील उपचार सुरु आहे. मात्र कुणीतरी रस्त्यावर विनापरवानगी व अतिउंच गतीरोधक टाकून माझ्या पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अंबादास कांबळे यांनी केला असून या प्रकरणी तपास करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी तक्रारीव्दारे कांबळे यांनी केली आहे.
या प्रकरणी तक्रार देण्यासाठी अंबादास कांबळे हे शहर पोलीस स्टेशनमध्ये गेले असता अशा प्रकारची तक्रार आपण घेवून शकत नसल्याचे सांगुन पोलीसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यामुळे आपण पोस्टाने पोलीस स्टेशनला तक्रार पाठविल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे. तक्रारीच्या प्रती जिल्हा पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व न.प. मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत.