कारंजा (लाड) : दोन वर्षापूर्वीच्या कोरोना महामारी संकटानंतर अलिकडे निर्बंधमुक्त उत्सव सण हे सर्वधर्मिय नागरिकांकडून साजरे करण्यात येत आहेत. लवकरच कावडयात्रा, पोळा, श्री गणेशोत्सव, ईद ए मिलाद, दुर्गोत्सव आदी सणउत्सवाची रेलचेल असणार आहे. मात्र सर्वच नागरीकांनी कायद्याचे भान ठेवून, शासकिय नियम व शर्थीचे पालन करून, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन सण उत्सव साजरे करून मिरवणूका काढण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिपजी पाडवी (सर) यांनी केले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की आगामी सर्वधर्मिय सण उत्सवाच्या पार्श्वभूमिवर नुकतीच कारंजा पोलीस स्टेशन कडून शांतता समिती बैठक घेण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचावर उपस्थितीमध्ये उपोअ प्रदिपजी पाडवी, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, सपोनि जयदिप पवार, प्रशांत सुबनावळ, निलेश मिश्रा, शांतता समन्वय समितीचे सन्माननिय सदस्य माजी नगराध्यक्ष विजय बगडे, राजाभाऊ चव्हाण, संजय कडोळे,श्रीकांत भाके, माजी नगरसेवक जुम्माभाई पप्पूवाले, बिसमिल्ला पहेलवान,श्याम सवाई इत्यादी उपस्थित होते. यावेळी आपल्या प्रास्ताविकातून बोलतांना शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला म्हणाले, "सध्याचे युग डिजीटल इंडियाचे असून सर्वच नागरीक भ्रमणध्वनीद्वारे समाजमाध्यमावर सक्रिय असतात.मात्र तरुणांनी डोकं जाग्यावर ठेवू संदेश पाठवण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजेत.अन्यथा त्याचे वाईट दुष्परिणाम संबंधिताना भोगावे लागतील शिवाय चारित्र्यहनन होऊन कायद्याप्रमाणे कठोर शिक्षेला सुद्धा सामोरे जावे लागते.त्यामुळे तरुणांनी समाजमाध्यमावर अतिरेक टाळावा.तसेच उत्सवात डीजेचा वायफळ खर्च न करता,पारंपारिक वाद्याला महत्व देवून उत्सव साजरे करीत गोरगरीब गरजू व्यक्तींना मदत करून आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साजरे केले पाहीजे." असे आवाहन त्यांनी केले. यानंतर मंचकावर उपस्थित सन्माननिय शांतता समिती सदस्यांनी देखील शांतता व सद्भावनेचा संदेश देऊन सर्वधर्मियांना सण उत्सवाच्या शुभेच्छा दिला. यावेळी मस्जिदचे मौलवी,कावड मंडळाचे, श्री गणेश मंडळाचे कार्यकर्ते तथा पत्रकार मंडळीची उपस्थिती होती.बैठकीचे संचालन व समारोप युवा पत्रकार श्याम सवाई यांनी केला.बैठकीच्या यशस्वीतेकरीता गुप्तचर विभागाचे हेकॉ मिथुन सोनोने तथा हेकॉ उमेश चचाने यांनी अथक परिश्रम घेतले.