चंद्रपूर : संरक्षण भिंत ओलांडून बिबट चक्क एका घरात घुसल्याची घटना सावली तालुक्यातील वनपरिक्षेत्रात येणार्या पाथरी येथे गुरुवार, 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, सावली येथील वनविभागाच्या चमूने बचाव मोहीम राबवून त्या बिबट्याला जेरबंद केले.
पाथरी येथील गोपाळ पाटील ठिकरे यांच्या घरामागे मोठे जंगल आहे. गुरुवारी त्यांचे कुटुंबीय गाढ झोपेत असताना अचानक बिबट्याने संरक्षण भिंतींवरून उडी मारून घरात प्रवेश केला. घरात बिबट्या घुसल्याची माहिती होताच ठिकरे कुटुंबीयांची मोठी तारांबळ उडाली. मिळेल त्या वाटेने ते घराबाहेर पडले. बिबट घरात घुसल्याची गोष्ट गावात वार्यासारखी पसरली. बिबट्याला बघण्यासाठी गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.
सावली येथील वनविभागाच्या कर्मचार्यांना तसेच पाथरी पोलिस ठाण्याच्या पथकाला याबाबत माहिती देण्यात आली. पाथरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश मोहोळ व सावली येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी कांबळी व त्यांची चमू ठिकरे यांच्या घरी दाखल झाली.
त्यानंतर घरातील सर्व मार्ग बंद करून एका मार्गावर पिंजरा लावून बचाव मोहीम राबविण्यात आली. एका तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. त्यानंतर गावाकर्यांनी सुटकेचा श्वास सोडला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विभागीय अधिकारी प्रशांत खाडे व वनपरिक्षेत्राधिकारी कांबळी यांच्या मार्गदर्शनात, सावली येथील व्याघ्र संरक्षक दलाचे डॉ. पुचडवार, वन्यजीव संरक्षक उमेश झिरे उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाथरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मंगेश मोहोळ व त्यांची चमू उपस्थित होती. बिबटला निर्सगमुक्त करण्यासाठी वनविभागाच्या अधिकार्यांनी त्याला जंगलाच्या दिशेने नेले. तिथे पशुधन विकास अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार व त्यांची चमू यांनी बिबटची तपासणी केली. बिबट हा मादी असून, अंदाजे 3 वर्ष वयाचा असल्याची माहिती वन विभागाने दिली