कारंजा : राज्याच्या हवामान विभागाच्या हवाल्याने साप्ताहिक करंजमहात्म्यने दिलेल्या वृत्तानुसार,दिवसभरच्या प्रखर उष्णतेनंतर,अखेर बुधवारी दि. १४ मे २०२५ रोजी,सायंकाळी ०६:०० वाजण्याच्या सुमारास वातावरणात बदल होऊन, जोरदार पाऊसाला सुरुवात होऊन धो धो पाऊस कोसळला. या पावसाने उकाड्यापासून हैरान झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याने, या पावसाचे स्वागत करण्यात येऊन,लहान मुलांनी पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.तर सध्या लगीनघाई असल्याने बाजारपेठेत आणि लग्नघरी धांदल उडाल्याचे दिसून आले.ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात बेधुंद पाऊस होत असल्याने आणि मान्सूनपूर्व पाऊस हा अवकाळी आणि बरेचदा वादळी पाऊस असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे.विजेच्या कडकडाटात,शेतकरी- शेतमजूर यांनी शेतात,हिरव्या झाडाखाली किंवा उघड्यावर थांबू नये. आपली शेळ्यामेंढ्या,गुरेढोरे सायंकाळ पूर्वी गावाकडे आणावी.ग्रामस्थांनी विजा होत असतांना घराबाहेर पडू नये. विजेची उपकरणे व मोबाईल बंद ठेवावे.नदी नाल्याला पूरस्थिती असल्यास त्यामधून स्वतःही जाऊ नये.व आपली वाहने, बैलगाड्या,दुचाकी व जनावरे नेऊ नये.चालू आठवड्यात, जोरदार ते अतिजोरदार वादळी पाऊस होण्याचे अनुमान असल्याने आपल्या शेतीचे, शेतमालाचे,कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विक्रीकरीता उघड्यावर असलेल्या धान्याचे, कौलारू घराचे व झोपड्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.नदी नाल्याच्या काठावर झोपड्या बांधून राहणाऱ्या ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घ्यावी.असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.