कारंजा (लाड) - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून,जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येणारी शासनाची "वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजना." केवळ साहित्यीक आणि परंपरागत लोककलाकार यांच्याच करीता राबविण्यात येत असते.परंतु शासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष्यामुळे,गेल्या पाच वर्षापासून सदर्हु योजना अंमलात आणण्याकरीता शासनाची "जिल्हा वृद्ध सहित्यीक कलाकार समिती" अस्तित्वात नसल्यामुळे जिल्ह्यातील लोककलावंत मानधनापासून वंचित असून कलावंताची परवड होत आहे.तसेच आज रोजी आमदार-खासदार आणि शासनाचे सरकारी निमसरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावर ज्याप्रमाणे वाढत्या महागाईला अनुसरून वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता दिला जातो.
त्याचप्रमाणे दुर्धर आजार ग्रस्त,वयोवृद्ध किंवा दिव्यांग लोककलावंत यांच्या दारिद्री परिस्थितीचा आणि वृद्धापकाळातील दुर्धर आजाराचा विचार करून शासनाने लोककलावंताच्या मानधनात महागाईच्या प्रमाणात वाढ करून, आजमितीला सरसकट किमान पाच हजार रुपये मानधन दिले पाहीजे.तसेच महत्वाचे म्हणजे "जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार समितीचे" गठन करीत असतांना,ज्याला कला किंवा लोककला म्हणजे काय ? याचा अभ्यासच नसतो.अशा कोणत्याही अजाणत्या व्यक्तिंना किंवा राजकिय पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यांना निवड समिती मध्ये अशासकिय सदस्य म्हणून न घेता, खऱ्याखुऱ्या हाडाच्या लोककलावंतालाच जिल्हा कलाकार निवड समिती मध्ये "अशासकिय सदस्य" म्हणून पदावर घेतले पाहीजे.असे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी, तहसिलदार कुणालजी झाल्टे साहेब यांचे मार्फत शासनाला निवेदन दिल्यानंतर पत्रकाराशी बोलतांना सांगीतले.याबाबतीत अधिक वृत्त असे की,गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र शासनाने लोककलांवताकडे अक्षम्य दुर्लक्ष्य करून त्यांच्या मानधन वाढीसह इतरही मागण्या प्रलंबित ठेवल्या आहेत. शिवाय पाच वर्षापासून वृद्ध साहित्यीक कलाकार समिती स्थापन न झाल्याने जिल्ह्यातील हजारो वयोवृद्ध कलावंताचे मानधनाचे प्रस्ताव पाच वर्षापासून मंजूर करण्यात आले नाहीत.त्यामुळे वयोवृद्ध कलावंता मध्ये शासनाविषयी तिव्र रोष व्यक्त करण्यात येत असल्याने विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून दि 24 जानेवारी 2024 रोजी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला असून,त्याकरीता विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांच्या नेतृत्वात बुधवार दि. 06 डिसेंबर रोजी तहसिलदार कुणालजी झाल्टे यांचे मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. त्यावेळी लोककलावंत संघटनेचे पदाधिकारी उमेश अनासाने, प्रदिप वानखडे,कैलास हांडे, हभप माणिक महाराज हांडे , अश्विन जगताप इत्यादी हजर होते.