अकोला:- गोंदवल्यात येणार्या लोकांना जागा कमी पडते म्हणून महाराजांनी देऊळ बांधायचे ठरवले. स्वतःच नकाशा काढला. गवंडी, सुतार लोक गावातलेच होते. फारसा पैसा नव्हता. पण दर्शनाला येणारे लोक पैसे ठेवत. बांधकामाचा त्यातूनच खर्च चाले. एकदा गाव जेवण घातल्यामुळे, महाराजांच्या जवळचा पैसा संपला. आठवड्याची मजुरीलाही पैसा नव्हता. महाराज मजुरांना म्हणाले, आज आठवड्याचा बाजार. तुम्ही इथेच जेवा. रामावर विश्वास ठेवा. त्याला काळजी आहे. दुपारी माने नावाचे गृहस्थ आले. त्यांना उसाचे पीक चांगलं झाल्यामुळे त्यांनी रामा समोर पुष्कळ पैसे ठेवले. मजुरीही दिली गेली व काही सामानही आणले गेले. मंदिर बांधून होत आल्यावर लोक विचारायचे, महाराज, मूर्ती कुठे आहे? महाराज म्हणाले, मंदिर रामाचे आहे. त्यालाच काळजी आहे. तोच येईल इथे चालत.
इकडे तडवळे गावी कुलकर्णीनी मंदिर बांधायला घेतले. राम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती आणल्या व वाड्यावर ठेवल्या. एकदा वाड्याला आग लागली. आगीची झळ त्या मूर्तीनाही लागली होती. कुलकर्णीच्या स्वप्नात येऊन मूर्ती म्हणाली, आम्हाला इथे किती दिवस कोंडून ठेवणार आहेस? गोंदवल्याला ब्रह्मचैतन्याकडे पोहचवा.
त्या दिवशी रविवार होता. जमलेल्या लोकांना महाराज म्हणाले, आज आपल्याकडे कोणीतरी मोठे पाहुणे येणार आहेत. आज आपण उपवास करू. भजन करू. नामस्मरण करू. सर्वांना थोडेसे फराळाचे देऊन दुपारी एक वाजता महाराज भजनास उभे राहिले. दोन तासानंतर महाराजांनी दोघांना रस्त्यावर उभे केले.
दोन गाड्यांमधून मूर्ती आल्याचे कळताच, महाराज सामोरे गेले. नामाचा जयघोष करीत सर्वजण आदराने रामरायाला घेऊन आले.
सात दिवसापूर्वीच महाराजांनी देवापुढे नारळ ठेवून अखंड नामस्मरण, भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठरवला होता. सिंहासन करून घेतले होते. रामरायाच्या मूर्तीची स्थापना केली तो दिवस होता शके १८१३ म्हणजे (सन १८११.) खूप मंडळी जमली होती. महाराजांनी सर्वांना प्रसाद म्हणून काही ना काही दिले. सुवासिनींच्या ओट्या भरल्या. भरपूर अन्नदान झाले. सर्व वातावरण राममय झाले.
महाराजांनी अत्यंत प्रेमाने रामरायाकडे पाहिले. त्यांचे डोळे डबडबले होते. ते रामाची करुणा भाकू लागताच त्यांच्या ओंजळीत रामाच्या गळ्यातील गुलाबाची फुले पडली. महाराज मूर्तीला मूर्ती न समजता प्रत्यक्ष रामरायाच समजत असत.
एकदा महाराज जमलेल्या लोकांबरोबर गप्पा मारत होते. प्रत्येक जण आपापली समस्या महाराजांना सांगत होते. महाराज म्हणाले, तुमची सर्वांची स्थिती किती खरंच काळजी करण्यासारखी आहे. पण मला काहीच काळजी नाही. मला मूलबाळ नाही. बायको आंधळी. पैसा तर नाहीच नाही. तरी पण मला काळजी वाटावी असे काही तुम्हाला वाटत असेल तर, सुचवा..
एक गृहस्थ म्हणाले, महाराज, आपण अन्नदानासाठी प्रसिद्ध आहात. महाराज म्हणाले, अहोऽ, पण आज घरात तिखटा-मिठाशिवाय काहीच नाही. तरी पण तो गृहस्थ म्हणाला, उद्या शंभर जोडप्यांना जेवायचे आमंत्रण द्यावे. बघा काळजी वाटते की नाही? महाराजांनी दुसऱ्या दिवसासाठी शंभर जोडप्यांना जेवणाचे आमंत्रण दिले.
दुसऱ्या दिवशी माणसे भजन कीर्तनाला बसले. महाराजांनी कीर्तनाला अभंग घेतला...
" आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो रे"
सुरुवातीला निरूपण चांगले रंगले. नंतर मात्र सर्वांची चुळबुळ सुरू झाली. कोणी म्हणे, निदान म्हातारी माणसे, व मुलांना तरी काही खायला मिळायला हवे. दुपारचे बारा वाजून गेले तरी, सारे शांत होते. एक मुलगा आईजवळ जेवण मागू लागल्यावर, ती म्हणाली, जा महाराजांना सांग. तो मुलगा महाराजां जवळ येऊन भूक लागली म्हणू लागला. महाराज म्हणाले, जा.. रामाला सांग..मुलगा
रामा जवळ जाऊन जेवण मागू लागला. आणि काय आश्चर्य ?
सामानाने भरलेली एक गाडी आली. स्वयंपाकाची सगळी तयारी होती. मालक महाराजां जवळ येऊन म्हणाला, महाराज मला मुलगा झाल्यावर २०० मंडळींना जेवण घालण्याचा संकल्प केला होता. तेव्हा कृपया या सामानाचा स्वीकार करावा.
महाराजांनी रामनामाचा गजर करत रामरायाला दंडवत घातला. लगेच स्वयंपाकाला सुरुवात झाली. स्वयंपाक झाला. नैवेद्य झाला. जेवणं झाले. सर्वजण तृप्त झाले. महाराज म्हणाले खऱ्या अर्थाने शुद्ध मनाने निष्ठापूर्वक रामावर भार टाकला तर, तो काही कमी पडू देत नाही.
सकाळी महाराजांनी एकदम भजनाला सुरुवात केली. अभंग घेतला....
"त्रेपन्न वर्षे भूमीभार। आता पाहू आपले घर।
देह मर्यादा सरली। मागे भक्ती करा भली।
दीनदास आनंदला। राम बोलावतो मला।।"
महाराज म्हणाले, आता मी नैमिष्यारण्यात जातो. हे ऐकताच लोक दचकले. लोक त्यांना न जाण्याबद्दल गयावया करू लागले. पण ते कोणाचेच ऐकत नव्हते. टांगा तयार करायला सांगितला. सर्व लोक साश्रूनयनांनी महाराजांच्या पाया पडले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....