नागभीड तालुक्यात यावर्षी पाऊस कुठे योग्य प्रमाणात पडला तर काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. मात्र, तरीही बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांची चांगल्या प्रमाणात वाढ झाली. उत्पादनात मोठी वाढ होईल असे वाटत असताना शेवटी शेवटी पिकांवर अचानक विविध रोगांनी आक्रमण केले. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होणार असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. सद्यस्थितीत धान कापणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीकडे शासनाने लक्ष घालून तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा सचिव दिपक खोब्रागडे, यांनी केली आहे.
अलीकडे हवामानाच्या लहरीपणामुळे आजचा शेतकरी वारंवार आर्थिक संकटात सापडला जात आहे. नागभीड तालुक्यात शेतकऱ्यांचे मुख्य पीक धान असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीला अतिवृष्टी झाली. नंतर धान पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे महागडी औषध फवारणी करावी लागली.
धानाच्या पिकांवर प्रामुख्याने काळ्या बुरशी, पिवळ्या बुरशी, पिवळ्या रोग,काळ्या रोग, बोरपीट या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगांमुळे धानाच्या पिकाचा बुंधा, पाने, देठ, कणसाची वाढ आणि दाणे यावर परिणाम होतो. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.
या संकटावर मात करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योग्य औषधांची शिफारस करणे, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना करणे, पीक पद्धतीत बदल करणे यासारख्या उपाययोजना कृषी विभागाने कराव्यात. अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा सचिव दिपक खोब्रागडे, यांनी केली आहे.