वाशिम : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : २६ जुन हा दिवस राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने सामाजिक न्याय दिनानिमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने आज २६ जुन रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली (सुर्वे) रोड, वाशिम येथे जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या उपाध्यक्षा तथा सदस्या डॉ. छाया कुलाल, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल.बी. राऊत, समाज भूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नागरीक गोपाळराव आटोटे, अनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष पी.एस. खंडारे, अनंतराव जूमळे, राजू झोंगळे व श्री. जमदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी वाशिम तालुक्यातील मानसी नर्सिंग कॉलेज, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज व राजर्षी शाहू महाराज नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून ३१ जात वैधता प्रमाणपत्राचे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.गजानन हिवसे यांनी केले. उपस्थितांचे आभार श्रीमती रणिता दसरे यांनी मानले.