जालना:- मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा होत असून, या दौऱ्यातील पहिली सभा जालना शहरात होणार आहे. जालन्यातील नवीन मोंढ्याजवळील पांजरापोळ मैदानावर उद्या (1 डिसेंबर) ही भव्य सभा होणार आहे. विशेष म्हणजे या सभेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे.
ज्यात सभेसाठी 140 एकरचे नियोजन करण्यात आले असून, 20 हजार दुचाकीच्या माध्यामतून रॅली काढली जाणार आहे. सोबतच जरांगे यांच्या स्वागतासाठी 130 जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव केला जाणार आहे. त्यामुळे या सभेत मनोज जरांगे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यक ती तयारी देखील आता अंतीम टप्प्यात आली आहे. चाळीस एकराच्या भव्य मैदानावर सभा होणार आहे, तर शंभर एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेची वेळ दुपारी 2 वाजताची असली तरी सर्वांना सकाळी 10 वाजताच येण्याची सूचना करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी देखील पूर्ण झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी शहरात 40 हजार चौरस फुटांचे होर्डीग्स आणि कटआऊट्स लावण्यात येणार असून सकल मराठा समाजाच्या बॅनर्सवर सर्व समाजातील थोर महापुरूषांचे फोटो लावण्यात येणार आहे. सभेत होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांसोबतच सकल मराठा समाजाचे दहा हजार स्वंयसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. जिल्हाभरातून तसेच अन्य ठिकाणावरून समाजबांधव मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.