वाशिम : वाशिम शहरातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ तथा व्यापक जनसंपर्क असलेले डॉ. तुषार वसंतराव गायकवाड यांनी १३ ऑगस्ट रोजी बुलढाणा येथील एका जाहिर कार्यक्रमात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात वाशिम जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक पूर्व आढावा बैठक झाली. यावेळी अ.भा. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, अनिस अहमद, नानासाहेब गावंडे, जिल्हा प्रभारी देवानंद पवार, जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक, प्रदेश सरचिटणीस दिलीपराव सरनाईक, प्रदेश सरचिटणीस दिलीप भोजराज, कृषी सभापती वैभव सरनाईक,मधुकरराव जुमडे, अॅड. पी.पी. अंभोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. तुषार गायकवाड हे वाशिम येथे सन २०११ पासून वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. मालेगाव तालुक्यातील पांगरी येथील मूळ गाव असलेल्या तथा महाराष्ट्रातील नामांकित समाजसेवक डॉ. वसंतराव गायकवाड यांचे ते ज्येष्ठ चिरंजिव आहेत. त्यामुळे सामाजिक कार्य, चळवळीचे बाळकडू त्यांना बालपणापासूनच मिळाले. वैद्यकीय सेवा व सामाजिक कार्य करीत असताना हजारो नागरिकांशी त्यांच्या जवळून संपर्क आला. अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केली. व्यापक जनसंपर्क असलेल्या डॉ. तुषार गायकवाड यांनी १३ ऑगस्ट रोजी बुलढाणा येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केला. सर्वसामान्यांसह सर्वच घटकातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य राहिल, काँग्रेस पक्षाची विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवू, पक्ष संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी निवडीनंतर व्यक्त केली.
............
डॉ. गायकवाड यांच्या रुपाने काँग्रेसची बाजू मजबूत
वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघ हा एस.सी. प्रवर्गासाठी राखीव आहे. डॉ. तुषार गायकवाड यांचा व्यापक जनसंपर्क, वैद्यकीय क्षेत्रातील उच्चविद्याविभूषित, अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रश्नांची जाण, सर्वसामान्य मतदारांशी जुळलेली नाळ बघता काँग्रेसला एक तगडा उमेदवार मिळाला असून डॉ. तुषार गायकवाड यांच्या रुपाने काँग्रेसची बाजू आणखी मजबूत, भक्कम झाली आाहे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहेत.