अकोला : अकोल्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणुन नाना कुलकर्णी सर्वाना परिचित आहेत. दोन पिढ्यांपासून संघाचे स्वयंसेवक, १९७५-७७ या काळात आणिबाणी मध्ये भूमिगत कार्य केले. १९९५ पासून सातत्याने भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा निवडणूक कार्यालयाची जवाबदारी सांभाळली तसेच भाजपचे पश्चिम विदर्भात विस्तारक म्हणुनही कार्य केले. स्थानिक रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयातुन प्रशासकीय अधिकारी म्हणुन निवृत झालेले नाना कुळकर्णी जुन्या शहरातील शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला या संस्थेचे उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष म्हणुन मागील दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. प्रचंड संपर्क, नर्मविनोदी स्वभावाच्या नानांचा पायी चालणे हा छंद आहे. दोन्ही पायांचे ऑपरेशन होऊन गुडघे बदली केल्यानंतरही रोज १० ते १५ कि.मी. अगदी सहजपणे ते चालतातं अतिशय कठीण समजल्या जाणारी ३५०० कि.मी. लांब पल्ल्याची अशी नर्मदा परिक्रमा १९ नोव्हेंबर २०२१ ला सुरु करून पुढील चार महिन्यात पायी चालत पूर्ण केली. यानंतर ४ नोव्हेंबर २०२२ ला त्यांनी गुजरातमधील ३६ कि.मी. लांब अशी गिरनार पर्वत परिक्रमा ११ तास १७ मिनिटात पूर्ण केली. ५ नोव्हेंबर २०२२ ला त्यांनी ४ तास ११ मिनिटांत श्री दत्त शिखर १० हजार पायऱ्या चढणे आणि उतरणे पूर्ण केले या दोन्ही कार्याची इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये नोंद सुध्दा झाली आहे.
तिसरा विक्रम म्हणजे या नंतर त्यांनी २० एप्रिल २०२३ ला उज्जैन पंचक्रोशी परिक्रमा पूर्ण केली. यानंतर अत्यंत कठीण अशी ३६ कि.मी. ची बालटाल ते अमरनाथ गुफा यात्रा एका दिवसात (जाणे व येणे) २२ जुलै २०२३ ला तर ३० ऑगस्ट २०२३ ला माहुर पंचक्रोशीची ३६ कि.मी. ची परिक्रमा पूर्ण केली.
१५ ऑक्टोबर २०२३ ला त्यांनी दिल्ली मॅरॅथॉन मध्ये भाग घेऊन २१ कि.मी. रनिंग करीत पूर्ण केली व याकरीता त्यांचा पदक देवून सन्मानही करण्यात आला. २५ नोव्हेंबर २०२३ ला पुन्हा दुस- या वेळेस गिरनार पर्वत परिक्रमा पायी चालून पूर्ण केली. व २७ नोव्हेंबर २०२३ ला श्री दत्त शिखर १० हजार पायऱ्या चालून पूर्ण केल्या. १० मार्च २०२४ ला अकोल्यात आयएमए द्वारा आयोजीत अकोला मॅरॅथॉन मध्ये भाग घेतला व २१ किं. मी. रनिंग करीत यशस्वीरित्या पूर्ण केले व पदक प्राप्त केले. २१ मे २०२४ ला अतिशय कठीण अशी चारधाम यात्रा पायदळ चालत काही अंतर वाहनाने पूर्ण केले. भारताचे प्रथम गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माना येथील स्वर्गरोहण मार्ग ते वसुधारा या धबधबा (जेथून पांडव स्वर्गात गेले) पर्यंत जाऊन पोहचले. त्यांच्या या कार्याची दखल इंडिया बुक रिकॉर्ड तशी नोंद करण्यात आलेली आहे. आपल्या दोन्ही पायांचे गुढगे बदल्ल्यानंतरही व वयाच्या ७४ व्या वर्षी विक्रमांची मालिका करणारे नाना कुळकर्णी फिटनेस आयकॉनच ठरले आहे. समाजाच्या सर्व स्तरातुन त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे