राज्यातील सर्व शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडण्यात येणार आहेत. शिष्यवृत्तीमध्ये होणारा गैरव्यवहार टाळण्यासाठी राज्य सरकरने हा निर्णय घेतला आहे. 1 जूनपर्यंत शिष्यवृत्ती योजना आधार कार्डशी जोडण्याची कार्यवाही सरकारकडून पूर्ण करण्यात येणार आहे.
शिष्यवृत्तीत गैरव्यवहार झाल्याचे यापूर्वी आरोप करण्यात आले होते. त्यामुळे हे गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि राज्यातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, यामुळे मध्यस्थ आणि दलालांचे उच्चाटन होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळावी, यासाटीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने जानेवारीमध्ये घेतला होता. ही परीक्षा 20 फेर=ब्रुवारीला होणार होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण परिषदेने घेतला होता. अद्याप या परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत.