पुण्यसंचय असेल तर भाग्य लाभते. तू सेवाव्रती आहे, तुझ्यातला भाव जीव जपणारा आहे. तर मग कशाला भिती बाळगतोस. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, "भाग्य कुणाला लाभे ऐसे । सद्गुणी कार्या वेळ जात असे ।।" कार्यात सद्गुण असेल तर व्यक्तीला समाजाचे चांगले कार्य, नैतिकतेचे पालन, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत होते. संत तुकाराम महाराज म्हणतात की, "भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकटवास बरा संतापायी ।।" जेथे आपण जाऊ तेथे प्रारब्ध बरोबर येत असते. परंतु संताच्या संगतीने आपल्याला एक प्रकारचा लाभ होतो. लोकांना वाटते की पत्नी, पुत्र, द्रव्य यांचा लाभ म्हणजे मोठे भाग्य. पण खरे भाग्य म्हणजे संताच्या पायापाशीच राहावे, त्यांची सेवा करावी. संताच्या पायापाशी जीव अर्पण करावयाची भक्ती देवाला मागावी.
भाग्याने लाभला देह हा, कूमार्गाने धाडू नको ।
पापे करुनी वडील अपुले, दुःखामाजी पाडू नको ।।धृ।।
आपल्याला हा मानवी जन्म मिळणे हे इतर जन्मापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. कारण या जन्मात आपल्याला ज्ञान, करुणा आणि परमार्थाची वाटचाल करण्याची संधी मिळते. हा देह आपणास भाग्याने मिळाला आहे. हा देह केवळ शारीरिक रुप नाही तर तो आत्म्याच्या प्रवासाचे एक साधन आहे. या देहात आपण चांगले कर्म करु शकतो, ज्ञान प्राप्त करु शकतो आणि परमार्थाकडे वाटचाल करु शकतो. कूमार्ग म्हणजे वाईट मार्ग किंवा चुकीचा मार्ग असा होतो. वाईट मार्गाने न जाता चांगल्या मार्गाचा अवलंब करा. वाईट मार्गाने दुःख भोगावे लागते. संत तुकाराम म्हणतात, "नका जाऊ आडराने, ऐसी गर्जती पुराणे ।।" देवाकडे जाणारा सोपा मार्ग सोडून तुम्ही भलत्याच माहित नसलेल्या आडरानाने जाऊच नका अशी गर्जना पुराणांनी केली आहे. पाप म्हणजे वाईट, चुकीचे तसेच खोटे बोलणे, चोरी करणे पापच आहे. कूमार्गाने गेल्याने तुझ्याकडून पाप घडतील आणि वडिलांना दुःखी करु नकोस म्हणजेच आपल्या कृत्यांनी किंवा वर्तनाने आपल्या वडिलांना दुःख, त्रास देऊ नको.
दुसऱ्याची कापुनी मान कधी, सावकार तू होऊ नको ।
सत्यपणाने मिळवी पैसा, चोराला कधी देऊ नको ।।१।।
दुसऱ्याची मान कापणे म्हणजे मान, अपमान किंवा वाईट गोष्ट घडणे. सावकार हा कर्ज देतो पण तो भरपूर व्याज लावून वसूल करीत असतो. तो कर्जदाराची मान कापत असतो. आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर परमेश्वरच आपले सावकार हे फार दयाळू आहेत. सगळं तो देत असतो आणि काहीच कमी पडू देत नाही. पैसा वाईट किंवा भ्रष्ट मार्गाने कमालेला असेल तर त्याला जास्त किंमत नसते. तो पैसा माणूस हवा तसा उधळतो. जसे- पाणी हे जीवन आहे तसेच पैशाशिवाय जीवन अशक्य होते. कष्ट करुन पैसा कमवा व आनंदाने खर्च करावा. कष्ट करुन कमावलेल्या पैशाला लक्ष्मी समजतात. सत्य काम करुन पैसे मिळविणे म्हणजे कोणताही गैरमार्ग किंवा अवैद्य मार्ग वापरला जात नाही. सत्याने कमावलेला पैसा चोराला देऊ नको. चोरीचा पैसा जास्त काळ जवळ राहत नाही आणि लवकर बाहेर निघून जातो. उदाः- एक शेतकरी शेतावर राबायला, घाम गाळून कष्टाची भाकरी खायचा. एक दिवस त्याचे गव्हाचे शेतात चार चोर घुसले. गव्हाचे पिक कापून चार गाठोडे बांधले. रात्रीचा अंधार होता. शेतकरी झोपेतून उठला. शेतकऱ्याने बुद्धीचा वापर केला आणि चोराला तो म्हणाला, तुम्ही मला सांगायचे असते. मीच तुम्हाला कापून दिले असते. अवकाळी पाऊस, गारपिट होऊन नुकसान झाले असे मी समजलो असतो. चोर शेतकऱ्याला घाबरले, चोरांनी शेतकऱ्यास क्षमा मागितली आणि चार गाठोडे तेथेच ठेवून निघाले. चोरी करणे पाप आहे.
गुरु आई आणि बाप थोर जन, यांची आज्ञा मोडू नको ।
ज्या मार्गाने लाखो तरले, असा मार्ग सोडू नको ।।२।।
गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपले मन जेथे गुंतले असेल तेथून तो त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. गुरुची आज्ञा मान्य केली तर तुमची आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. आई वडील आपल्याला जन्म देतात, वाढवतात आणि शिक्षण देतात. ते आपले जीवान आपल्यासाठी समर्पित करतात. त्यांची आज्ञा मोडू नये. कारण त्यांच्या भावना दुखावल्या जातात. आईवडील जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात. त्यांची आज्ञा पाळून विश्वास संपादन करा. तसेच थोर व्यक्तीची आज्ञा मोडणे योग्य नाही. थोर व्यक्तीचे मार्गदर्शन व त्यांचे आदेशाचे पालन करणे महत्त्वाचे आहे. ज्या मार्गाने लाखो तरले तो मार्ग तू सोडू नको म्हणजे ज्या मार्गाने अनेकजण यशस्वी झाले आहेत तो मार्ग सोडू नको. हा भवसागर तरण्याचा मार्ग ईश्वर भक्ती, ध्यान मार्ग, साधना, सद्गुरु सेवा होय. कलियुगात भवसागर तरण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अविरत नामस्मरण. त्यामुळे आपण एकतत्व नाम जे दृढ भावनेने घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही.
किती ज्ञान झाले तरी अंगी, गर्व कुणाला दावू नको ।
तुकड्यादास म्हणे या जन्मी, उद्धारल्यावीण राहू नको ।।३।।
आपल्या अंगी परिवर्तन घडवून ज्ञानाने आपल्याला केवळ वस्तुस्थितीपूर्ण माहितीने पुष्ट केले. अंगी नाही ज्ञान देवा मला पाव अशी स्थिती व्हायला नको. हे ज्ञान सद्गुरु कडून आपल्याला मिळते पण अंगी ज्ञान आल्याचा गर्व, अहंकार कधीही करु नकोस. मिळविलेले ज्ञान इतरांना देण्याकरिता वापर करावा. "जीवनात कधी करु नये गर्व. देवा हाती सर्व आहे सारे. भले भले आले, येऊनिया गेले. मातीतच गेले, ठेव ध्यानी. चार दिवसाचे प्रवासी आपण. कशाला मी पण आणतोस."
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मनुष्य जन्माला आलास तर उद्धारावीण राहू नको. मनुष्य जन्माचा उद्धार म्हणजे जीवनाला सार्थक बनवणे. सत्य, न्याय, प्रेम, करुणा, नम्रता यासारखी नैतिक मूल्ये आत्मसात करावी. नकारात्मक विचारापासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मनुष्य जन्माचा उद्देश मोक्ष मिळवणे हा आहे मग ते सोडून मनुष्य नको ती कर्मे का करत बसतो. उद्धार म्हणजे एखाद्याला वाईट परिस्थितीतून बाहेर काढणे, दुःख, संकटातून मुक्त करणे किंवा सुधारणे. धार्मिक दृष्टीने उद्धार म्हणजे आत्म्याला मोक्ष प्राप्तीकडे नेणे किंवा वाईट कृत्यांपासून मुक्त होणे. या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडल्याने जीवनाला शांती, सुख अवस्था प्राप्त होते. मोक्ष आपणास दुःख, निराशा यापासून सुटका करते म्हणून नामस्मरण करा. राष्ट्रसंत म्हणतात.
हरिनाम जपा मन लावूनिया ।
मग मोक्ष सुखा किती वेळ असे ।।
बोधः- जीवनातील उद्धाराचा मार्ग हा सोज्वळ असावा ना की काटेरी. वाईट मार्गाने जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. वाईट मार्ग अधोगतीला नेऊन आयुष्याचा नाश करते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जो आपल्या गावाची सेवा करतो तोच मान आणि कीर्तीने तरतो. मग कुठे आपल्या जन्माचे सार्थक होईल.
अपुल्या गावाची सेवा जो करितो ।
तोचि कीर्तीने, मानाने तरतो ।
दास तुकड्या म्हणे होई सार्थ ।।
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....