"गीता सांगते की, मी म्हणजे माझं शरीर अशी स्वतःची ओळख धरुन माणूस चालतो. पण ज्याच्या अस्तित्वामुळे हे शरीर जिवंत आहे त्या आत्म्याची जाणीव ठेवीत नाही."
अर्जूनाचा श्रीकृष्णाला प्रश्नः-
हे केशवा जर "मृत्यू" सगळ्यांना येणार असेल तर हे भजन, कीर्तन, पूजा, अर्चा, हा सत्संग कशाला? "जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे, आणि जो सत्संग करतोय त्यालाही !"
श्रीकृष्णाने अर्जूनाला सांगितलंः-
"मांजर जेव्हा उंदराला पकडते तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन खाऊन टाकते, पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने आपल्या पिलांना पकडते तेव्हा त्यांना खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत, तोंडही तेच आहे. फक्त परिणाम वेगवेगळे आहेत."
तसेच मृत्यू हा एकच आहे, पण एक प्रभुच्या चरणामध्ये विलीन होईल. तर दुसरा ८४ फेऱ्यामध्ये अडकतो.
मृत्यू हे अंतिम सत्य आहे, तरी लोकं त्याला घाबरतात कारण कुठल्याही आवडत्या, चांगल्या गोष्टीचा शेवट येऊच नये असे आपल्याला वाटत असते. माणसाच्या इच्छा ह्या मरेपर्यंत संपत नाही. ज्याचा जन्म होतो त्याला मृत्यू हा अटळ आहे. अर्जून हा माया, ममतेच्या मोहात अडकून त्याचे हातातून गांडीव धनुष्य गळून पडलेला हतबल अर्जून आपल्याला दिसतो. युद्ध भूमिवर आपल्याच नातेवाईक, गुरुंना आपण कसे मारावे? अशाप्रकारे सर्वसामान्य लोक अर्जूनासारखे द्वंदात सापडतात. त्यांना काय नक्की करावे हे कळत नाही.
भगवान श्रीकृष्ण अर्जूनाला सांगतात की, हे अर्जूना लढाईमध्ये आपले आप्त आपल्या हातून ठार होतील, त्याचे भय तू वाटू देऊ नकोस. कारण त्यांचे देह नष्ट झाले तरी त्यांच्या आत्म्याचा नाश कुणीच करु शकणार नाही.
विनाशी देह हे सारे बोलावे त्यात शाश्वत ।
नित्य निःसीम तो आत्मा अर्जूना झुंज यास्तव ।
जो म्हणे मारितो आत्मा अंतरी जो मरतो म्हणे ।
दोघे न जाणती काही न मरेची हा ।।
या आत्म्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही. हा आलाही नाही की गेलाही नाही. हा स्थिर आहे. देहाला मारले तरी तो मरत नाही. याला शस्त्रे मारु शकत नाही. याला अग्नी जाळू शकत नाही. याला पाणी भिजवू शकत नाही. हा सर्वव्यापी आहे. हा निर्विकार आहे. देहाला मारले तरी आत्मा मरेल असा शोक करणे योग्य नाही. हे भगवंताचे म्हणणे थोडे बुचकळ्यात टाकणारे आहे. बरेच लोकांची समजूत अशी आहे की, मृत्यूनंतर आत्मा तेरा दिवस देह जेथे मेला तेथे घोटाळत राहतो आणि तेराव्या दिवशी श्राद्ध झाल्यावर निघून जातो. खरे सांगायचे झाले तर हे एक थोतांड आहे. देहात आत्मा असेल तर देहानंतर तो राहीलच कसा? तो आत्मा देहात राहतो. देह नसेल तर तो कुठे राहणार.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतातः-
अरे ! ज्या धर्मात तू जन्मला, त्याच्या गीतेत असे सांगितले आहे की, आत्मा हा अमर आहे. फक्त नाश होतो तो नाशिवंत शरीराचा. जोपर्यंत वासना जीवाशी लागली आहे, तोपर्यंत सुख दुःख कधीही नाश पावणार नाही. कपडे बदलले म्हणजे का माणसे बदलत असतात. तसेच शरीर बदलले म्हणजे का माणसे बदलत असतात? त्या दुःखाची निवृत्ती ही कर्तव्याने, ज्ञानानेच करावी लागते.
एखादा मनुष्य जुन्या वस्तूंचा त्याग करुन नविन वस्तू खरेदी करतो किंवा नवीन कपड्यांचा वापर करतो व जुने कपडे टाकून देतो. त्याप्रकारे आत्मा देखील जुना देह टाकून देऊन नवा देह धारण करतो. हेच आत्म्याचे खरे सत्य आहे. तो आत्मा कशाने कापला ही जाऊ शकत नाही म्हणूनच आत्मा हा अमर आहे. तो आत्मा अविनाशी, चिरंजीव आहे. देह मेला तरी आत्मा कधीच संपत नाही.
"मृत्यू हा मनुष्याला त्याच्या चांगल्या वा वाईट इच्छेच्या कार्याकरिता ताजातवाना करून देणारी विश्रांती आहे ! म्हणूनच ज्ञानी लोक मृत्यूला आपली शुभ वेळ समजतात." -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
हा मनुष्य जन्म परत परत मिळणारा नाही. आपला जीव प्रपंच्याच्या कचाट्यात अहोरात्र गुंतून पडल्यामुळे परमार्थ साधता येत नाही. नामस्मरणाचा अभ्यास प्रापंचिक कामे करीत असताना ही होण्याजोगे आहे. राष्ट्रसंत म्हणतात.
नच जाई तिर्थधामा, बसरे करीत कामा ।
कामात लक्ष रामा, वरी ठेव अंतरीचे p।।
शब्दांकन:-
लेखक पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....