मूल : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेत मजुरावर काटवन येथील कक्ष क्रमांक ७५६ मधील नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली. रामभाऊ कारु मरापे वय ४३ असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या चमुने घटनास्थळी जावुन पंचनामा केला व पुढील सोपस्कार करीत आहेत.
मूल येथील हरडे यांच्या मालकीच्या शेतात मृतक रामभाऊ मरापे हा शेतमजूर म्हणून कामाला होता. नेहमी प्रमाणे आज मंगळवार ला सकाळी ८ वाजता मृतक रामभाऊ मशागती करीता शेतात जात असतांना शेता लगतच्या नाल्यामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला केला. घटनास्थळाच्या पाहणीत मृतकाने मृतकाने हल्ला परतवुन लावण्यासाठी प्रयत्न केले. परंतु साधना अभावी त्याला वाघाचा बळी व्हावा लागला. झालेल्या हल्ल्यात रामभाऊचा जागीच मृत्यु झाला. घटनास्थळ हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येत असुन सभोवताल घनदाट जंगल आहे. त्यामुळे या परीसरात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असुन परिसरात यापुर्वी अनेकदा वाघाच्या हल्याच्या घटना घडल्या असुन वाघाच्या हल्यात आजपर्यंत परीसरात तीन व्यक्तींचा आणि १० ते १२ जनावरांचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबत करावा. अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मृतक रामभाऊ मरापे याच्या कुंटूबियास वनविभागा तर्फे आर्थिक मदत देण्यात आल्याची माहीती वन परीक्षेञ आधिकारी घनश्याम नायगमकर यांनी दिली आहे.