स्थानिक शहरातील नगरपरिषद मार्फत केला जाणारा पाणीपुरवठा ऐन कडक उन्हाळ्यात मागील दोन दिवसांपासून बंद आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळा अतिशय कडक जाणवत आहे. अशा परिस्थितीत शहरात कोणतीही पूर्वसूचना प्रसारित न करता अचानक पाणी पुरवठा करणे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या तोंडांचे पाणी बेमालूमपणे हिरावण्यात येत आहे.
गडचिरोली शहराचे उष्णतामान शिगेला पोहोचले असतानाच काल दि.०५ मे २०२२पासून शहरात नळाचे पाणी सोडणे स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने थांबविले आहे. अचानक पाणीपुरवठा बंद का करण्यात आला, यापासून अनभिज्ञ असलेले नागरिक दोनही दिवस नळाच्या तोटीजवळ दीडदोन तास वाट पाहत बसले, मात्र नळ न आल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. नळ बंद का ठेवण्यात आले, याची कोणालाच खबरबात माहिती नाही. वर्तमानपत्रे वा इतर माध्यमांद्वारेही कोणतेच कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही, म्हणून संतप्त नागरिक प्रशासनाच्या नावाने बोटे मोडत आहेत. दररोज कचरा जमा करणारी गाडी ध्वनिक्षेपकाद्वारे जनतेला "कर भरा; जप्ती टाळा" असे आवाहन करत फिरत असते. इतरवेळी नळ बंद राहील, म्हणून सूचनाही प्रसारित केल्या जातात. मात्र ऐन कडक उन्हाळा सुरू असूनही जनतेला याची थोडीही माहिती केलेली नाही. नागरिकांना असह्य उन्हाचे चटके सोसत पिण्याच्या व स्वयंपाकाच्या पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे. नगरपरिषदेने मौन धारण करून नागरिकांच्या तोडांचे पाणी बेमालूमपणे का हिरावले? पुढे किती दिवस नळाची प्रतिक्षा करण्यास भाग पाडणार? या माहितीपासून नागरिकांना अंधारात ठेवले जात आहे, याचेच नवल वाटते.