राहुरी : एका नराधमाने ५ वर्षीय बालिकेचे अपहरण करत तीच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. या नराधमाने कपड्याच्या सहाय्याने बालिकेचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील आरडगांव शिवारात घटना घडली आहे. (attempt to take life away of a 5 year old girl after sexually abusing her)
आरडगांव येथील किशोर पवार या व्यक्तीने एका ५ वर्षीय बालिकेला तिच्या घरातून उचलून नेले. त्यानंतर त्याने त्या ५ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला आणि तीचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केला. १८ जून रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान त्या ५ वर्षीय बालिकेचे आई-वडील बाहेर गेले होते. त्या संधीचा फायदा घेऊन आरोपी किशोर ऊर्फ केश्या विजय पवार याने त्या बालिकेला तिच्या घरातून उचलून नेले. आरडगांव परिसरात असलेल्या नारळाच्या झाडा जवळील एका शेताच्या बांधाजवळ त्या नराधमाने त्या बालिकेच्या अंगावरील कपडे काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
त्यानंतर कापडाच्या सहाय्याने तीचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत असलेल्या तिच्या आईने ही घटना पाहिली. तिने ताबडतोब त्या नराधमाला जागेवरच पकडून आरडाओरड केली. पीडित बालिकेचे वडील येत असल्याचे पाहून त्या नराधमाने पीडित बालिकेच्या आईला ढकलून तो घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर पिडीत बालीकेला अहमदनगर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात नराधम आरोपी किशोर ऊर्फ केश्या विजय पवार, (राहणार आरडगांव, ता. राहुरी) याच्या विरोधात अपहरण, बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकाने तातडीने आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केले. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.