कारंजा (लाड) : पौराणिक काळात वसिष्ठ ऋषींच्या सप्तर्षी शिष्यमंडळीपैकी,करंजऋषींनी या स्थानावर तपश्चर्या करून स्थापन केलेल्या ऋषीसरोवराचे किनाऱ्यावरील,कारंजा नगरीमधील,आद्यशक्ती कारंजेकरांची कुलस्वामिनी मातृशक्तिपिठ आणि शिवछत्रपती शिवरायांचे ऐतिहासिक श्रद्धास्थान असलेल्या,श्री कामक्षा देवीच्या शारदीय नवरात्री उत्सवाला सोमवार दि.२२ सप्टेंबर २०२५ पासून शुभारंभ झाला आहे. उल्लेखनिय म्हणजे करंजऋषींनी स्वतः स्थापन केलेली कारंजा नगरी ही अतिशय पुरातन पौराणिक,धार्मिक,सांस्कृतिक व ऐतिहासिक नगरी असून येथील श्री.कामाक्षा माता म्हणजे आसाम प्रांतातील गोहाटीच्या कामापिठ कामाख्या देवीचेच द्वितीय स्थान मातृशक्तीपिठ म्हणून ओळखल्या जात असल्याने संपूर्ण भारतामधील विविध राज्ये आणि प्रातांतील मातृशक्ति उपासक येथे येत असतात.श्री.नवरात्रोत्सवानिमित्त दि.२२ सप्टेंबर २०२५ रोजी, श्री.कामाक्षा देवी संस्थान कारंजा येथे श्री.कामाक्षा मातेचा दुग्धाभिषेक करून रोहित महाराज महाजन व सौ.अंकिता रोहित महाजन यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येवून महाआरती करण्यात आली. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष हभप दिगंबर महाराज महाजन, राहुल महाजन,श्री. कामाक्षा मातेचे मानाचे मुख्य गोंधळी हभप. ज्ञानेश्वर विठ्ठलराव कडोळे, राज्य शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी कलावंत संजय मधुकरराव कडोळे, कमलेश कडोळे, दिनेश कडोळे यांनी संबळ तुणतुणे गोंधळी वाद्यावर महाआरती केली. यापुढे दैनंदिन आरती दररोज दुपारी १२:०० वाजता तसेच रात्री ०७:०० वाजेला होईल. उत्सव काळात दररोज दुपारी ०२:०० ते ०५ : ०० वाजेपर्यंत आणि रात्री ०९:०० ते १०:३० पर्यंत भजनाचे कार्यक्रम होणार असून दि.२७ सप्टेंबर रोजी रात्रीचे आरती नंतर जोगव्याचा कार्यक्रम होईल. तरी भाविकांनी या दिवशी उपस्थित राहून श्री कामाक्षा मातेला जोगव्याचे दान अर्पण करावे. दि. २९ सप्टेंबर रोजी महाष्टमी निमित्त दुपारी ०२:०० ते ०५ : ०० वाजेपर्यंत दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कारंजा कडून सप्तशतिचा सामुहिक पाठ होणार असून माताभगिनींनी सप्तशतीच्या सामुहिक पाठाला आवर्जून उपस्थित रहावे.त्यानंतर रात्री ०९:०० वाजता होमहवनाला प्रारंभ होऊन रात्री १२:०० वाजता पूर्णाहूती व महाआरती होईल.सदहू महाआरतीचे भाग्य भाग्यवंतालाच लाभते.श्री. कामाक्षा माता ही जागृत देवता असून नवसाला पावणारी, कार्यक्षणी धावून येणारी कामाक्षा माता आहे.त्यामुळे महाष्टमीचे महाआरतीला भाविकांनी आवर्जून उपास्थित रहावे.असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच श्री कामाक्षा मातेच्या नवरात्रोत्सवानिमित्त दि.१० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ०६:०० वाजता महाप्रसाद करण्यात येणार आहे.तरी या "महाप्रसादाच्या कार्यक्रमाला प्रत्येक मातृशक्ती उपासकांनी स्वेच्छेने आपला हातभार लावण्याकरीता तनमनधनाने अन्नधान्यांची व आपल्या कडून यथाशक्ती मदत करावी." असे आवाहन श्री कामाक्षा देवी संस्थानचे अध्यक्ष हभप. दिगंबर महाराज महाजन यांनी केले असल्याचे वृत्त रोहीत महाजन यांनी कळविले आहे.