आजच्या धावपळीच्या युगात जिथे मूल्यांवर आधारित शिक्षण कमी होत चाललं आहे. तिथे श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरे आज काळाची गरज बनत चालली आहे. या सुसंस्कार शिबिरामुळे मुलांमध्ये चांगले विचार, चांगले आचरण आणि चांगले जीवनमूल्ये रुजतात. ज्यामुळे मुले चांगले नागरिक बनू शकतात. शिबिरामुळे सत्य, प्रेम, करुणा, नम्रता, प्रामाणिकपणा यासारखी नैतिक मूल्ये विकसित होतात. सुसंस्कार शिबिरामुळे मुलांचा व्यक्तीमत्व विकास घडतो. या सुसंस्कार शिबिरात सकाळी उठणे आणि सामुदायिक ध्यान प्रार्थना करावी लागते. नंतर प्राणायाम, योगा, मल्लखांब, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, व्यसने, थोर संताचे कार्य, लाठीकाठी, फायर जंप, कराटे, संगीत, बौद्धिक ज्ञान शिकविले जाते. सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व रात्री कथाकथन आणि राष्ट्रवंदना घेतली जाते. असा हा नित्य क्रम असतो.
श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे प्रवर्तक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, श्रीगुरुदेव सेवाश्रम नांदूरा हे आहेत. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असताना व्यायाम वर्ग, बौद्धिक वर्ग, शिक्षण वर्ग, भजन वर्ग असायचे. हे शिबिर ३ महिन्याचे असायचे. त्यावेळी सुसंस्कार शिबिर होत नव्हते. या भजन वर्गाचे विद्यार्थी हरिभाऊ वेरुळकर गुरुजी होते. त्यावेळी केशवदास रामटेके वर्ग प्रमुख असायचे. राष्ट्रसंताचे वर्गात तुकाराम दादा, सुदामदादा सावरकर असायचे. श्रीगुरुदेव सेवाश्रम नांदूरा येथे प्रथम सुसंस्कार शिबिर आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी १९८१ साली चालू केले म्हणजेच भरविले होते. या सुसंस्कार शिबिरात गुलाबराव महाराज भजन शिकवायचे. प्रल्हादराव पारिसे व्यायाम शिकवायचे. लक्ष्मणदास काळे महाराज हे या शिबिराचे शिक्षक होते. आज संपूर्ण महाराष्ट्रात आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी मार्फत एकूण ६८ ठिकाणी सुसंस्कार वर्ग चालतात तसेच महाराष्ट्राबाहेर वेरुळकर गुरुजी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगाना, राजस्थान येथे सुसंस्कार शिबिरे चालवितात. आचार्य वेरुळकर गुरुजी राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण प्रचारक वर्ग चालवितात. त्यामधून किर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, भागवतकार, कार्यकर्ते निर्माण होतात. गुरुजींचे हे कार्य फार मोलाचे आहे.
आजचा बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील ।
गावाचा पांग फेडतील उत्तम गुणांनी ।।
या कलियुगाच्या काळात आजचा तरुण मोबाईल, टीव्हीच्या नादात दिशाहीन झालेला आहे. त्यामुळे त्याच्या मनावर सतत कुसंस्कार पडत असून आज समाजात चोरी, व्यसनाधिनता, बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. मुले आई-वडिलांचे ऐकत नाही. आजचा तरुण राष्ट्रप्रेमी, शरीराने धडधाकट घडवायचा असेल तर आपल्या मुलांना श्रीगुरुदेव सुसंस्कार शिबिरात पाठवा तेव्हा तो विद्यार्थी घडतो. तसे पाहिले तर आई-वडील उत्तम संस्कार मुलांवर करु शकतात. फक्त वडिलांनी मुलाला तंबाखू, बिडी-सिगारेट, खर्रा, दारु आणायला लावू नये. राष्ट्रसंत ग्रामगीतेत म्हणतात.
बालपणीच शिक्षण होई । वय झालिया त्रास जाई ।
मग वळविले न वळविल्या जाई । इंद्रिय त्यांची ।।
शिबिरात दिनचर्या शिकविली जाते. विविध विषयाचे बौद्धिक ज्ञान दिले जाते. या चांगल्या संस्कारामुळे बंधुप्रेम, आई-वडीलांची सेवा, गीता, ग्रामगीता, रामायण मानवता धर्म ई. विषय शिकविले जाते. हनुमंत ठाकरे ग्रामगीताचार्य, धामणगाव रेल्वे यांनी आचार्य वेरुळकर गुरुजींवर लिहलेली कविता बघू या.
सूर्य उगवला संस्काराचा ।
जगी ज्ञानदीप लाविला ।।धृ।।
सूर्य जसा उगवल्या बरोबर त्याच्या प्रकाशात सर्व विश्व उजळून निघते. तसेच आचार्य गुरुजी हे संस्काराचे सूर्य आहेत. गुरुजींनी संपूर्ण महाराष्ट्रात सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ज्ञानाचा दिवा लाविला, त्या ज्ञानाच्या प्रकाशामुळे मुले-मुली ज्ञानमय होत आहे.
श्री गुरुदेवाचा सहवास, गुरुजी तुम्हा लाभला ।
संस्काराचा ध्वज हाती, राष्ट्रसंतांनी दिला ।।१।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सहवास आचार्य वेरुळकर गुरुजींना लाभला. राष्ट्रसंतांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनातून गुरुजी घडले. सुसंस्कार शिबिराचा ध्वज राष्ट्रसंत यांनी वेरुळकर गुरुजी यांना दिला.
अखंड दानी अखंड यात्री, गुरु सेवेला ।
आचार्य हरीभाऊंनी, अपूला देह झिजवला ।।२।।
आचार्य गुरुजींनी राष्ट्रसंत यांची मनोभावे गुरुसेवा केली. ते अखंड यात्री म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन सुसंस्कार वर्ग चालवित म्हणजेच सुसंस्काराचे अखंड दान, ज्ञान देतात. त्यांच्या कार्यात कोणताही खंड नाही.
संस्काराच्या शिबिर यज्ञाने, तरुण केला महान ।
गाव गावे फिरुनी, पेटविल्या संस्काराच्या मशाला ।।३।।
या सुसंस्काराच्या यज्ञाचे अग्नीत तूप, तांदूळ, नैवेद्य टाकणे नव्हे तर सुसंस्काराच्या यज्ञाच्या माध्यमातून ज्ञानदान करुन मुलं, तरुण घडविण्याचे कार्य गुरुजींनी केले. गावोगावी जाऊन गुरुजींनी सुसंस्काराच्या मशाली पेटविल्या म्हणजे तरुणांना अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन गेले. ज्ञानाची मशाल पुढे नेणे म्हणजे प्रचारकाकडून दुसऱ्या प्रचाराकडे हे कार्य सोपविणे, जबाबदारी देणे.
ऐसे आचार्य पुण्यशिल, गुरुजी आम्हा लाभले ।
दीक्षा देऊनी संस्काराची, जनार्धनी दिला सन्मान ।।४।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कृपापात्र असलेले आचार्य गुरुजीत नम्रता, दया, प्रेम, सत्य, निष्ठा हे सद्गुण आहेत. असे पुण्यशिल गुरुजी आम्हास लाभले. गुरुजींनी संस्काराची दीक्षा सर्वांना देऊन जन सामान्यांना घडविले. बरेच प्रचारकांना त्यांनी सन्मान दिला म्हणजे अखंडता किंवा विशेषाधिकार दिला म्हणून आम्ही गुरुजींचा आदर करतो.
संस्काराच्या महासागराला, आयुष्य लाभो कोटी कोटी ।
हनुमंतदास म्हणे, चला जाऊ गुरु दर्शनाला ।।।।५।।
आचार्य गुरुजी सुसंस्काराच्या माध्यमातून चांगले विचार, ज्ञान प्रदान करतात म्हणून गुरुजी हे सुसंस्काचे महासागर आहेत. अशा गुरुजींना कोटी कोटी आयुष्य लाभो. हनुमंत ठाकरे ग्रामगीताचार्य म्हणतात, गुरुदेवाचे दर्शनाला जाऊ या. गुरु दर्शनाला जाणे म्हणजे धार्मिक, आध्यात्मिक अनुभव व आशिर्वाद गुरुजींचा घेऊ. गुरु शिष्याला आत्मज्ञान व आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवितात.
श्री पुरूषोत्तम बैसकार मोझाकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....