कारंजा : समाजातील जनतेला- मतदार संघाचा सर्वांगीन विकास, जनतेचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव व कर्जमाफी,गोरगरीब मध्यमवर्गीयाच्या मुलाकरीता उच्च शिक्षणाची सोय,सुशिक्षीत पदवीधरांना नोकरी व्यवसाय, बेरोजगाराच्या हाताला रोजगार, कारंजा येथील श्री दत्तावतार -श्री नृसिह सरस्वती स्वामी यांचे पवित्र जन्मभूमी संस्थान,शक्तीपिठ श्री कामाक्षा देवी संस्थान आणि जैन धर्मियांची देशभरात सुप्रसिद्ध तिर्थक्षेत्रे ग्राह्य धरून कारंजा शहराचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून संपूर्ण विकास तसेच वनविभागाच्या सोहोळ काळविट अभयारण्य पर्यटन केन्द्राचा रखडलेला विकास करून पर्यटन केन्द्र पर्यटकाकरीता खुले करून ग्रामिण भागातील ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे. व शासनाच्या योजना सवलती मिळविण्याकरीता - कारंजा मानोरा मतदार संघातून विधानसभेत,तळागाळातील ग्रामीण भागाच्या सामान्य जनतेचे प्रतिनिधीत्व करण्याकरीता, निःस्वार्थी,विश्वासू व कार्यतत्पर असा सच्चा आमदार निवडायचा आहे.त्याकरीता जनतेच्या मतदाना मधून केवळ एका व्यक्तीची आमदार म्हणून निवड केली जात असते.यंदा पुढील तिन महिन्यांनी विधानसभा निवडणूका होणार असून,त्याकरीता विविध राजकिय पक्षांनी उमेद्वार देण्याकरीता सक्षम उमेद्वाराची चाचपणी सुरु केलेली असतानाच,प्रत्येक पक्षात उमेद्वारीवरून अस्वस्थता असल्याचे वृत्त मिळत आहे.शिवाय प्रत्येक राजकिय पक्षात वेगवेगळे गट असल्याने प्रत्येक गटाचे नेते स्वपक्षाकडून आपल्या गळ्यातच उमेद्वारीची माळ कशी पडेल ? यासाठी प्रयत्नरत आहेत.तसेच स्वपक्षाकडून उमेद्वारी देण्यापासून डावलण्यात आलेच तर,वेळप्रसंगी स्वपक्षाला सोडचिट्टी देत इतर पक्षाशी किंवा विरोधी पक्षाशी घरठाव मांडून विरोधी पक्षाकडूनच उमेद्वारी मिळविण्याकरीता देखील अनेक इच्छुकांनी प्रयत्न सुरु केलेला आहे.त्यामुळे निवडणूक रणांगणात उतरणाऱ्या सर्वच राजकिय पक्ष आणि विशेष म्हणजे गटा गटात बंडखोरी होणे अटळ आहे.ह्या व्यतिरिक्त स्वतःला स्वयंघोषीत आदर्श समाजसेवक म्हणवून घेणारे हौसे,गवसे,नवसे आपआपली अपक्ष उमेद्वारी दाखल करून प्रमुख राजकिय पक्षाच्या सक्षम उमेद्वाराच्या नाकी नऊ आणणार आहेत.मग वेळप्रसंगी हातमिळवणी करीत पाठींबा देण्यासाठी,स्वतःचा फॉर्म भरण्यापासून निवडणूक लढविण्याचा खर्च व्याजासह वसूल करणार आहेत.त्यासाठी पठिंब्याच्या बदल्यात वेळप्रसंगी हे हौसे गवसे नवसे उमेद्वार, प्रमुख राजकिय पक्षाच्या अधिकृत उमेद्वाराकडून,लाखो रुपयाची खंडणी घेऊन त्यांचे कडून आपला उल्लू देखील सिधा करून घेणारच आहेत. (अर्थात स्पष्टच सांगायचे म्हणजे पक्षाच्या प्रमुख उमेद्वाराला ब्लॅकमेलिंग करण्यासाठीच मतदार संघात निवडणूकीच्या रणांगणात शेकडो उमेद्वारी अर्ज दाखल होण्याचा अंदाज आहे.) आजपर्यंत पस्तिस ते चाळीस उमेद्वाराची नावे समोर आलेली आहेत.त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून शेकडो उमेद्वारी अर्ज दाखल होण्याचा अंदाज आहे.विशेष म्हणजे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याकरीता स्थानिक नेत्यांपेक्षा बाहेरच्या नेत्यांचा उत्साह जास्त दिसत असून मुंबई,यवतमाळ,दिग्रस,अकोला, रिसोड,वाशिम,मंगरूळपीर, मानोरा येथील नेत्यांच्या नजरा येथे लागलेल्या आहेत.परंतु आता कारंजा मानोरा मतदार संघातील मतदार देखील जागरूक झाले असून ते डोळस आहेत,त्यामुळे निवडणूकीत उभे रहाणारे उमेद्वार कोण ? कोठले ? मतदार संघात त्यांचा परिचय कसा ? कारंजा मानोरा मतदारसंघ आणि समाजासाठी त्यांनी आजतागायत कोणते उल्लेखनिय कार्य केले ? तसेच त्यांच्या आमदारपदी निवडीमुळे मतदार संघाचा कोणता विकास होईल ? हे चांगलेच जाणून आहेत.आणि म्हणूनच स्थानिक मतदार, (आपले अमूल्य मत वाया घालवणार नाहीत.तर) मतदार संघाचा विकास करण्यास समर्थ असणाऱ्या व निवडून येणाऱ्या उमेद्वाराच्याच पारड्यात आपले मत टाकणार.यात शंकाच नाही. परंतु उत्साह म्हणून, लोकशाहीच्या प्रक्रियेत कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील निवडणुकीमध्ये लवकरच भरणाऱ्या स्वयंघोषीत भावी आमदारांच्या बाजाराकडे मतदाराचे लक्ष्य लागले आहे. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले.