वाशिम - दिल्ली येथे होणार्या ३३ व्या राष्ट्रीय खो -खो स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करणार्या सब ज्युनिअर गटामधून विदर्भस्तरीय मूले आणि मुलींचे संघ निवडण्याकरिता शुक्रवार, २७ ऑक्टोंबर रोजी स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे ३३ व्या सबज्युनिअर विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेला प्रारंभ झाला. जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय खानझोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ खो खो असोसिएशनचे पदाधिकारी टी. ए. सोर, कोषाध्यक्ष अशोक मोरे, युवासेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश महाले, शहरप्रमुख रमेश पाचपिल्ले, श्रीधर देशमुख, सतीश डुबे, गोपाल गोटे, संजय इंगळे, विशाल राऊत, उमेश इंगोले आदींची उपस्थिती होती. सदर विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धा पुढील तीन दिवस क्रीडा संकुलावर खेळविल्या जाणार आहेत. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी संपूर्ण विदर्भातून मुलामुलींचे संघ दाखल झाले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाशिम जिल्हा हौशी खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंद राऊत यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक बोरकर यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाला जिल्ह्यातील खो -खो खेळाडू, विद्यार्थी तसेच क्रीडाप्रेमींची बहूसंख्येने उपस्थिती होती. सदर स्पर्धा २७ ते २९ ऑक्टाेंंबर असे तीन दिवस खेळल्या जाणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.