आपण या सृष्टीचे पाहूणे आहोत, हे कधी कळेल मानवाला? जन्माला येणे आहे आणि मरणे आहे. येथे आपण आहोत तोपर्यंत आपलं मेल्यानंतर आपलं येथेच सोडावं लागत. जिथे माणुसकी संपली तिथे अनादराची वागणूक, खोटं बोलणं, अपमान करणे, फसवणूक करणे, छळ करणे, पैशासाठी, धनासाठी नाते संपविणे ई. सुरुवात होते. स्वामी विवेकानंद म्हणतात की, "माणुसकी हाच धर्म आहे. माणसाची मानवता, प्रेम आणि करुणा यासारख्या गुणालाच खरा धर्म मानले पाहिजे. माणुसकीचा धर्म श्रेष्ठ आहे. मनुष्य ही जात आणि मानवता हाच खरा धर्म." माणुसकीचा धर्म मोठा कारण तो दैवजात आपल्या रक्तात असतो. बाकीचे धर्म मनुष्य निर्मित आहेत. आपल्याला देवाने माणूस म्हणून जन्माला घातले तर आपले कर्तव्य आहे की, माणुसकीने वागावे, भेदाभेद करणे टाळावे.
भेदभाव कशाला, माणसा माणसात रे ।।धृ।।
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे "हुकूमशाही" आणि माणसा माणसात भेद मानणारी "संस्कृती." भेदभाव हा एक विषयुक्त बीज आहे. हे भेदभावाचे बीज माणसाला, समाजाला खोखला बनविते म्हणजे पोकळ, त्रास सहन करणे. त्याचे चुकीमुळे त्याचेवर वाईट परिणाम होतो. तो निरर्थक, बेकार, व्यर्थ गोष्टीकडे लक्ष देतो. ईश्वराने माणसाला एक समान बनविले पण काही लोकांनी भेदभाव सुरु केले. समाजात राहायचे तर सेवा करायला पाहिजे. लहान मोठ्यात फरक करु नये. "गावागावासी जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा" हा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामागीतेतून जनतेला दिला. भेदभाव म्हणजे गट, वर्ग, श्रेणी निर्माण करणे. अन्याय करणे. दुसऱ्याला त्याचे अधिकारापासून वंचित करणे.
अपुल्या समानची प्रीती सर्वांना ।
अपुल्या जिवाचा मोह सर्वांना ।
हे नाते ओळखावे जीवनात रे ।।१।।
सर्वांसाठी समान संधी असावी. कोणत्याही व्यक्तीला त्याची जात, धर्म, लिंग, आर्थिक स्थिती, अपमान यावर आधारित भेदभाव न करता समान संधी द्यावी. समान प्रीती म्हणजे सर्व माणसांना एकसारखे प्रेम देणे हे खूप महत्त्वाचे आहे. प्रेम हे भावना नाही तर एक शक्तीशाली ऊर्जा आहे जी आपल्याला एकत्र आणते. प्रेम देणे ही एक भेट आहे. प्रेम प्राप्त करणे हा सन्मान आहे. प्रत्येकाला आपल्या जिवाचा मोह असतो. संत तुकाराम म्हणतात, "मुंगी आणि राव, आम्हा सारखाची जीव" राष्ट्रसंत म्हणतात, "तुझा जिव प्रीय तुज जैसा ! तसा इतरास नाही का !" तुला तुझा जिव प्रीय आहे तसाच दुसऱ्याला सुद्धा जिव प्रीय असतो. जीवनात नात्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. तुमच्या जीवनात मैत्री, प्रेम कां बरे टिकत नाही. लोकांना दिलेली समानता म्हणजेच जीवन होय.
तो एक करुनी सामान देतो ।
मी एक करुनी त्यासी पुरवितो ।
दोघांचा जीवनात दिसे हात रे ।।२।।
शेजारधर्म म्हणून शेजारी एक एक तुम्हाला सामान देतो तसेच मी सुद्धा त्याला एक एक पुरवित असतो. जीवन जगण्यासाठी दोघांची एकमेकांना साथ असावी लागते. देव देतो म्हणून आपण सर्वांना पुरवितो. तो आपल्याला अन्न, पाणी, घर. आरोग्य देतो पण या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन मदत करायला हवी. दोघांचा जीवनात हात असावा लागतो.
दोघे मिळूनी जीवनात साजवी ।
दोघांचा संसार ऐक्याने दाखवी ।
मग काय दाखवावी जात रे ।।३।।
साजवी म्हणजे योग्य, उपयुक्त किंवा त्या कामासाठी तो माणूस योग्य आहे. ज्या संसारात आनंद, सुख, समाधान, तृप्तता असते तो संसार जग किंवा आपलं कुटूंब होय. एकमेकांवर मनापासून प्रेम करणारी माणसं ज्या घरात राहतात, एकमेकांची काळजी घेतात. एकाला काही झाल तर दुसऱ्याच्या हृदयात दुःख होत. संसारात कुरकुर न करता आनंदाने राहतात त्याला सुखी संसार म्हणतात. स्त्री आणि पुरुष यांचा संसार म्हणजे एक घर, एक कुटूंब, एक जीवन निर्माण करतात. दोघांचा संसार सोन्यासारखा चालत असेल तर जाती जातीमध्ये भेद निर्माण करणाऱ्या विकृतीला बळी पडू नका.
सकळासी कळू दे हा धर्म वेड्या ।
तोडोनी टाकी ह्या भेदांच्या बेड्या ।
तुकड्या म्हणे जुनी टाक कात रे ।।४।।
धर्म म्हणजे एका विशिष्ट प्रणालीमध्ये श्रद्धा आणि विधी यांचा समावेश असलेल्या श्रद्धा आणि विधींच्या माध्यमातून देवाशी किंवा अलौकिक शक्तीशी सबंध जोडण्याची पद्धत. यात उपासना, नैतिक आचरण, धार्मिक भावना असावी. मानवता धर्म म्हणजे माणसांनी एकमेकांसाठी प्रेम, करुणा आणि सहकार्याची भावना ठेवून जगणे. तसेच इतरांना मदत करणे आणि त्यांचे कल्याण करणे. तू धर्मभेदाच्या बेड्या तोडून टाक. धर्मावर आधारित भेदभाव करणे गैरकानुनी आहे. जाती आणि धर्मभेद नष्ट व्हावा असे सगळ्यांना वाटत असते पण सध्या तो नष्ट न होता आणखीन तो मजबूत आणि सुधारित होत आहे. धर्म भेदाच्या बेड्या म्हणजे एकाला श्रेष्ठ मानणे, दुसऱ्याला कमी मानणे. राष्ट्रसंत म्हणतात की, "धर्म पोरांचा पोरखेळ नाही रे" धार्मिकतेच्या चुकीच्या मार्गाने चालणारा धर्म वेडा. सर्व धर्म समभाव म्हणजे प्रत्येक धर्माला मान देणे. सर्व धर्म एकाच अंतिम ध्येयाकडे म्हणजे मोक्ष किंवा मुक्तीकडे घेऊन जातात. राष्ट्रसंत म्हणतात की, तू जुनं सोडून दे. जसे साप आपली कात काढून टाकते तसं तू जुनी कात, जुने विचार टाकून दे आणि प्रत्येक प्राणीमात्रावर प्रेम कर. हाच खरा मानवता धर्म आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
धर्म नही कहता, किसके बहुबेटीपर निगा करो ।
धर्म नही कहता, किसके घर लुटो बर्बाद करो ।।
धर्म नही कहता, किसके जीवोंपर हथियार धरो ।
धर्म नही कहता, किसके मजहबपर आघात करो ।।
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....