कारंजा (लाड)(जिल्हा प्रतिनिधी संजय कडाळे): संपूर्ण विदर्भाला सध्या उष्णतेच्या तिव्र झळा सोसाव्या लागत असून, पावसाळ्याचा पहिलाच संपूर्ण महिना जून कोरडा जात असल्याने विदर्भावर दुष्काळाचे प्रचंड महासंकट घोंघावत आहे. आणि त्यामुळे विदर्भाच्या ग्रामिण भागातील वस्ती वाडे, तांड्यावरील शेतकरी व शेतमजूरांच्या जीवाची घालमेल होत आहे. पाउसच बरसत नसल्याने, शेतकर्यांची मशागत करून तयार असलेल्या जमिनी भकास दिसत आहेत. शेतकरी राजा टक लावून आभाळाकडे पहात आहे. तर शेतमजूरांच्या हाताला कामच नसल्याने, बेरोजगारीचे संकट ग्रामिण भागातील शेतमजुरावर कोसळले आहे व त्यामुळे उपजीवीका कशी करावी असा प्रश्न शेतमजूरांना व महिला मजूरांना पडला आहे. जून महिना म्हटला म्हणजे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचा हंगाम सुरु होतो त्याप्रमाणेच त्यांच्या मुलाबाळांचा शाळा महाविद्यालयाचा हंगाम (नविन सत्र) सुरु होत असते.आणि मुला मुलीच्या शाळा महाविद्यालय प्रवेशा करीता शेतमजूरांना पैशाची निकड भासते परंतु जेथे हाताला काम आणि खर्चाला दामच नाही तेथे मुलामुलीची शैक्षणिक सोय कशी करावी ?असा प्रश्न शेतमजूरांना व विशेषतः महिला मजूरांना भेडसावत आहे त्यामुळे काय करावे अशा विवंचनेत ग्रामिण मजूर सापडला आहे. तरी शासनाने मजूरांच्या जनधन खात्यात शेतमजूरांना-मजूर महिलांना आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामिण भागातून पुढे येत असल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे .