संपूर्ण मानवी जीवन हे काम,क्रोध,अहंकार,लोभ,मत्सर आदी विकारांच्या आहारी गेलेले असते.त्यामुळे आजचा मानव प्राणी असत्य आणि विश्वासघातकी झाल्याचे, समाजात घडणाऱ्या विविध घटनांनी वेळोवेळी दिसून आलेले आहे.परंतू अशा वागण्याने मानव हा मानव राहीला नसून, कलीयुगातील दानव झाल्याचीच प्रचिती वेळोवेळी दिसून येत आहे.एवढेच नव्हे तर स्वतःच्या स्वस्वार्थापायी मनुष्यप्राणी हा हिंसक अशा वृत्तीचा झालेला आहे.हा सर्व कलीयुगाचा प्रभाव आहे.असेच म्हणावे लागेल. वास्तवात प्रत्यक्ष परमेश्वराने "मानवाला परोपकारासाठी जन्माला घातले आहे.मात्र परमेश्वराला न घाबरता,त्यांच्या अस्तित्वाची जाणीव न ठेवता, आजचा मानव लोभी,लबाड, ढोंगी झालेला आहे.त्याचे "दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत." त्यामुळे तो स्वस्वार्थापायी समाजातील दुसऱ्या माणसाचा विश्वासघात करून तो त्यांचे घरदार,जमिन जुमला,मालमत्ता लुटून माया जमविण्यात मुश्गील आहे." पूर्वी आपले बापदादे आपल्या मुलाबाळांवर सुसंस्कार घडवितांना सांगायचे की, "चांगली कर्म करा.म्हणजे मृत्युनंतर स्वर्गात स्थान मिळेल. तर दुसऱ्याची फसवणूक करून वाईट कर्मे केलीत तर नरकात यमयातना भोगाव्या लागतील." हे पटवून देण्यासाठी पूर्वी "यमपूरी" सचित्र कॅलेंडर सुद्धा होते. फार पूर्वी "जशी पापकर्मे कराल.तशा यमयातना भोगाव्या लागतील." असा धाकदडपा सचित्र कॅलेंडरामधून दाखवीला जायचा.जेणेकरून मानवाने पापकर्माच्या फंदात न पडता सत्वशिल जीवन जगले पाहिजे. त्याशिवाय वेगवेगळ्या पौराणिक ग्रंथ आणि पुराणामधूनही तत्कालिन लेखकांनी, "माणसाला राक्षसी कृत्य न करता,पुण्यवान देवमाणूस होण्यासाठी सत्कर्माचा उपदेश केल्याचे आणि वाईट कृत्य करणाऱ्याला,मृत्युनंतर नरक यातना भोगाव्या लागणार असल्याचा उल्लेख स्पष्ट केलेला असल्याचे आढळून येते.परंतु आजच्या मानवाने त्याने निर्माण केलेल्या स्वतःच्या विज्ञानयुगात पाऊल ठेवले आहे.त्यामुळे देवधर्मावरील आणि ग्रंथ पुराणावरील त्याचा विश्वास उडालेला असून,स्वतःच्या प्रगती करीता त्याने साम-दाम-दंड-भेद ह्या शस्त्रास्त्रांचा अंगीकार करून, येन तेन प्रकारे स्वतःची माया जमविण्याकरीता तो दुसऱ्याची जर्र जमिन,मालमत्ता हडपण्यावर भर देत आहे. दुसऱ्याची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी आज अनेक ठिकाणी भांडणतंटे,मारामाऱ्या,खुनाचे प्रकार,स्लोपॉयझनच्या घटना घडत आहेत.व एकीकडे इतरांशी लबाडी व फसवणूक करून स्वतःची माया जमविल्या जात आहे.त्याकरीता तो,प्रामाणिक,इमानदार, कमजोर आणि दुर्बल व्यक्तींवर अन्याय अत्याचार करून त्यांच्या संपत्तीची लुट करीत आहे.मात्र हे कोठवर चालणार ? स्वार्थी लबाडाच्या पापाला भुर्दंड आता प्रत्यक्ष परमेश्वरच देणार आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये प्रत्यक्ष परमेश्वरानेच सांगीतले आहे की, "यदा यदा हि धर्मस्यग्लानीर्भवति भारत । अभ्युत्थानंधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥" अर्थात जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय अत्याचार होतो.सत् धर्माची हानी होते.पुण्यात्म्याचा छळ होतो. तेव्हा तेव्हा नव्याने धर्मसंस्थापनेसाठी भगवंताचा अवतार होतो.ती वेळ आता समिप येऊन ठेपलेली आहे.या कलियुगात पांढरपेशे लबाड लांडगे,सज्जनतेचा बुरखा पांघरून सज्जनांचा घात करीत आहेत.सज्जनांना लुटत आहेत. त्यांना धमकावून एकप्रकारे मानसिक दृष्ट्या स्लो पॉयझनने, त्यांचे बळी घेऊन त्यांच्या मालमत्तेवर अक्षरशः दरोडा टाकीत आहेत.अशा प्रसंगी प्रतिकार करण्याची शक्ती नसलेल्या दुर्बलांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष परमेश्वर धावून येणार असून "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सड्रोsस्त्वकर्माणि ।।" अशा प्रकारे केलेल्या कर्माचे फळ परमेश्वर प्रत्येकाला जिवंतपणीच देणार आहे.पूर्वी पूर्वज सांगायचे पुण्यवानाला मेल्यानंतर स्वर्गात जागा मिळेल.आणि पापी जनांना नरकयातना भोगाव्या लागतील. परंतु कलियुगात तो काळ केव्हाच मागे पडलेला आहे.आता प्रत्येक मानवाला त्याच्या कर्माचे फळ जीवंतपणी याच ठिकाणी भोगावे लागणार आहे.सज्जनांचा छळ करून त्याच्या मालमत्तेवर दरोडा टाकणाऱ्याला आता दुसऱ्याच्या मालमत्तेचा उपभोग घेताच येत नाही.दुसऱ्या कडून लुटलेली धनदौलत त्यांच्या घरात काळ म्हणून प्रवेश करेल. मानवाला घामाची,स्वतःच्या हक्काची मालमत्ता सुख आणि आनंद देते.तर दुसऱ्याचे अंतःकरण दुखवून लुटलेल्या त्याच्या धनदौलत मालमत्तेमुळे, दुसऱ्याच्या वेदना आणि श्राप सातत्याने पाठलाग करीत असतात.त्यामुळे लबाड-स्वार्थी व्यक्तीच्या घरातील सुख चैन निघून जाते.त्याला आणि त्याच्या अख्ख्या कुटूंबीयाला विविध दुर्धर आजार किंवा अपघाताचा सामना करावा लागतो.वेळप्रसंगी त्याचेच कर्म त्याचा काळ होऊन पुढे उभे ठाकते.व त्यामध्ये अशा पापात्म्याचा बळी सुध्दा जात असतो.अखेर त्याच्या पापाचे प्रायश्चित्य येथेच पूर्ण होते.ही "काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे." त्यामुळे मानवाने परमात्म्याचे ईश्वरी अस्तित्व मान्य करून,प्रत्येकाने आपले जीवन नि:स्वार्थी,परोपकारी,पावित्र्य राखून,दुसऱ्याचा आदर करून, दिनदुबळ्यांच्या साह्याला उभे राहून,शक्य तेवढे सत्कर्म आणि दानधर्म करून करीत,सुख समाधान आणि आनंदाने जगलं पाहिजे.म्हणजे आपल्या सत्कर्माचे चांगले फळ मिळून उर्वरीत आयुष्य तर सुखात जाईलच.शिवाय मृत्युनंतरही स्वर्गच मिळेल.
लेखक : संजय कडोळे, गोंधळीनगर,कारंजा (लाड) जि.वाशिम.४४४१०५.
आपल्या प्रतिक्रिया द्या....