सणावारांच्या दिवसात शासनाने खाजगी ट्रॅव्हल्सद्वारे प्रवाशांची होणारी लुट थांबवावी.
कारंजा (लाड) :- राज्यात भारतिय संस्कृती व परंपरा म्हणून बहिण भावांच्या "रक्षाबंधन" ह्या पवित्र सणाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. ह्या पवित्र सणाला प्रत्येक धर्माची बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाकडून आपल्या रक्षणाची हमी घेते.त्यामुळे ह्या सणाचे पावित्र्य प्रत्येक जाती,धर्म आणि भारतवासियांमध्ये जपल्या जात असून ह्या सणानिमित्त बहिण भावाकडे माहेरी जात असते. किंवा लहान असो वा मोठा भाऊ हमखासपणे बहिणीकडे जात असतो.जेणेकरून राखीच्या पवित्र धाग्याने भावाचे रक्षण होईल.आणि प्रत्येक भाऊ बहिणीच्या रक्षणाची जाणीव ठेवील.म्हणूनच पुणे,मुंबई किंवा अन्यत्र रोजगार वा नोकरी निमित्त गेलेले भाऊ बहिणीकडे किंवा बहिणी भावाच्या घरी येत असतात. परंतु सणावाराच्या या संधीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स (लक्झरी गाड्याचे) एजंट त्यांच्या मनाप्रमाणे मनमानी करतांना दिसून येत असते. हे खाजगी गाड्यांचे एजंट तिकिटाचे दर आपल्या मनमानी दिडपट दुपट्ट पद्धतीने वाढवतांना दिसून येत आहे. ह्याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास, सणवार सोडले तर इतर दिवशी, कारंजा येथून पुणे येथे जाण्यासाठी ८००-९०० रुपये प्रवासभाडे आकारणारे ट्रॅव्हल्स एजंट रक्षाबंधन आणि दिपावली असे सणवार पाहून प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहून,मनमानी कारभार करून प्रवाशांना कारंजा ते पुणे व इतरत्र ठिकाणी प्रत्येक प्रवाशी २००० ते २३०० रुपये भाडे आकारत आहेत.आणि त्याहीवर,त्यांचे एजंट व कारकून उघडपणे म्हणतात की हा आमचा हंगामाचा काळ आहे. आणि ह्याच वेळी आमची कमाई असते.यावरही शिरजोरी म्हणून दिवाळीनिमित्त तर हे एजंट कारंजा ते पुण्याचे भाडे ३००० ते ३५०० रुपये वाढवतात.येथे नमुद करावयाची प्रवाशांची तक्रार म्हणजे खाजगी ट्रॅव्हल्स आणि प्रवाशांचे आगाऊ आरक्षण बुकींग करणारे एजंट यांचेवर शासनाचा अंकुश का नाही ? राज्याचा परिवहन विभाग यांचेवर नियंत्रण ठेवू शकत नाही का? जेव्हा महाराष्ट्र परिवहन, राज्य महामंडळाच्या बसेससाठी दर ठरवितात.तेच दर खाजगी बससाठी कायम असायला हवे आहेत. आणि शासनाचे खाजगी ट्रॅव्हल्स एजेन्सीवर सुद्धा नियंत्रण असायला हवे असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. तरा देखील राज्याचे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री तथा संबंधीत परिवहन अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देवून सर्वसामान्यांची सणासुदीचे दिवसात दरभाड्याची समस्या सोडवून प्रवाशांना लुट होण्यापासून वाचविण्याची मागणी होत आहे.