कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयातील कु.जान्हवी मनोज ढवक व तनुजा पांडे ह्या दोन विद्यार्थिनींनीनी तयार केलेली "लेग रेस्टर फ्रेंड ऑफ फार्मर"ही प्रतिकृती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.शाळेचे मुख्याध्यापक प्रा.सुरेश राठोड व विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा मार्गदर्शक शिक्षक गोपाल खाडेंच्या मार्गदर्शनात तयार केलेली ही प्रतिकृती प्राथमिक गटातून आता राज्यस्तरावर वाशिम जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
नागपूरचे प्रादेशिक विद्या प्राधिकरण,जि.प.चा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा मुख्याध्यापक संघ, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ आणि स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोकलगाव येथे ७ जानेवारी व ८ जानेवारीला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले.या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला असून, त्यांनी तयार केलेल्या ८२ प्रतिकृतींचे सादरीकरण करण्यात आले.
सहाही तालुकास्तरावरील निवड झालेल्या प्रतिकृती घेऊन विद्यार्थी जिल्हास्तरावर सहभागी झाले होते. जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील विद्यार्थिनी कु.जान्हवी मनोज ढवक व कु. तनुजा पंकज पांडे या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरावर सहभाग नोंदवत आपल्या प्रतिकृतीचे सादरीकरण जिल्हा स्तरावर केले.शेतीतील विविध कामे करताना शेतकऱ्यांना नेहमी उठावे बसावे लागते. गुडघा जमिनीला टेकऊन काम करावे लागते. त्यामुळे गुडघ्यावर ताण पडतो.शिवाय गुडघ्याला काटे व काड्या टोचल्या जातात.लेगरेस्टरमुळे विशिष्ट प्रकारची गादी गुडघ्यावर येत असल्यामुळे गुडघ्याचे रक्षण होते.लेगरेस्टरमध्ये जोरदार आवाज निर्माण करता येत असल्यामुळे जनावरे पळवून लावता येतात.यात असलेल्या लाईट ट्रॅप मुळे शत्रू किडींपासून शेताचे रक्षण होते. विशिष्ट आवाज करणारी योजना येत असल्यामुळे पाखरे दूर पळून जातात. या प्रतिकृती मुळे जमीनीत व्हायब्रेटर द्वारे कंपने निर्माण करता त्या कंपनामुळे विंचू व सापासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांना दूर ठेवता येतात. शेतकऱ्याचे जीवाचे रक्षण करता येते.प्रतिकृतीचा जिल्हा स्तरावर प्राथमिक गटामध्ये तिसरा क्रमांक आला.अमरावती येथे जानेवारी महिन्यात संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत जिल्हा परिषद विद्यालयाची जानवी व तनुजा वाशिम जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. यावेळी जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव व ब्ल्यू चिप कॉन्व्हेंट कारंजा च्या गटात जानवी व तनुजा या दोघींनी सहभाग नोंदवून जिल्ह्यावर तिसरा क्रमांक पटकावला.ते आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक प्रा. सुरेश राठोड, पर्यवेक्षक तथा मार्गदर्शक शिक्षक गोपाल खाडे,वर्गशिक्षिका दिपाली खोडके व आपल्या आई-वडिलांना देतात.