अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य , अकोल्यातील ज्येष्ठ व्हायोलिन वादक व संगीत गुरु पं. मनोहरराव काळे यांचे आज दिनांक २ मे २०२५ रोजी त्यांच्या डाबकी रोड येथील राहत्या घरी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. बालपणापासून आपल्या संगीताची आवड वडिल मनीराम काळे यांची व्हायोलिन ऐकून त्यांनी जोपासली. त्यानंतर व्हायोलिनचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नागपूर येथील पं.प्रभाकरराव धाकडे यांच्याकडे पूर्ण केले . वयोवृद्ध असूनही संगीताची व समाजसेवेची आवड असणारे काळे काका दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने विविध संगीत कार्यक्रमात आपल्या व्हायोलिन वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत होते . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या दृष्टी गणेशा या रक्तदान, नेत्रदान व अवयव दान जनजागृती कार्यक्रमात निरंतर दहा वर्ष त्यांनी व्हायोलिन ची साथ संगत करून जनजागृतीसाठी सहकार्य केले* .एवढेच नव्हे तर संस्थेमार्फत व्हायोलिन कार्यशाळेतही निःशुल्क मार्गदर्शन करून संगीताची सेवा त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील दिग्गज गायक वादकांसोबत त्यांनी साथ संगत केली होती त्यांच्या या अनुभवाने मला सुद्धा संगीत क्षेत्रात पुढे वाटचाल करण्यासाठी त्यांचे प्रदीर्घ व अनमोल मार्गदर्शन मिळाले.त्यांच्या अचानक जाण्यामुळे अकोल्याच्या संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याचे भाव उद्गार दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे सहयोगी प्राध्यापक डॉ. विशाल कोरडे यांनी व्यक्त केले. स्व. मनोहरराव काळे यांच्या मागे त्यांचा संगीत वारसा चालवण्यासाठी चंद्रकांत काळे हा त्यांचा मुलगा संगीत साधना करीत आहे . गणेश नगर स्थित दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या कार्यालयात संस्थेच्या सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन स्व.मनोहरराव काळे यांना मौन श्रद्धांजली अर्पित केली.