शुक्रवार ५जानेवारी २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित झालेला ”सत्यशोधक” हा चित्रपट क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर झळकला. विशेष म्हणजे हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत हा सिनेमा आहे. या चित्रपटामध्ये ज्योतिराव फुलेंच्या भूमिकेत संदीप कुलकर्णी, तर सावित्री माईची भूमिका राजश्री देशपांडे साकारली आहे. समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि आपल्या विदर्भाच्या मातीतील अकोला शहरात रहिवासी असलेले निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित चित्रपटाची निर्मीती आपल्या अकोल्यातील तहसीलदार राहुल तायडे, प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ यांनी केली आहे. तर सहनिर्माता राहुल वाबखंडे, हर्या तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे, बाळासाहेव बांगर यांनी केले आहे. चित्रपटात आपल्या अकोल्यातील प्रसिध्द व्यक्तीमत्वांना काम करण्याची संधी मिळाली आहे. अकोल्याचे उपजिल्हाधिकारी राहीलेले प्राध्यापक संजय खडसे तसेच तुकाराम बिडकर अशा मोठ्या कलाकारांचा सहभाग आहे. या चित्रपटाशी संबंधीत सर्व मान्यवरांचे प्रथमत: मनःपूर्वक अभिनंदन आहे. बराच कालावधीनंतर खऱ्या इतिहासावर आधारित प्रथमच सत्यशोधक चित्रपटाचे निर्मिती झाली आहे.
अकोला : महात्मा फुले यांच्या जीवन व कार्यावर आधारीत असलेल्या सिनेमावर काय भाष्य कराव, परंतु जो इतिहास वाचणार नाही तो इतिहास घडवू शकणार नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अनुसरून खरंच हा चित्रपट प्रत्येक नागरिकांनी विद्यार्थ्यांनी तसेच सहपरिवार बघून इतिहासाची खरी माहिती मिळण्यासाठी हा चित्रपट एकदा बघावाच अशी मांडणी चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे. संदीप कुलकर्णी व राजश्री देशपांडे यांनी खूप चांगल्या प्रकारे आपली भूमिका निभावली आहे महात्मा ज्योतिराव फुले यांची हृदयस्पर्शी भूमिका साकारताना त्यांच्यामध्ये खरंच महात्मा ज्योतिराव फुले यांचीच प्रतिमा खरीखुरी दिसत होती आणि त्यांच्या अभिनय बघितल्यानंतर प्रेक्षकांचे डोळे पानावले होते. चित्रपटामध्ये प्रत्येकाची भूमिका ही वेगवेगळी असून त्यांनी त्यांच्या अभिनय अतिशय मार्मिकपणे सादर केला. चित्रपटांमध्ये लहुजी साळवे यांची भूमिका आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना वेळप्रसंगी साथ देताना दाखविलेला त्यांचा अभिनय प्रेक्षकांना मोहात पडणार होता. चित्रपटांमध्ये शूद्र - अतिसुत्रांना शिक्षणाचा व इतर कामाचा अधिकार मिळवून देण्याचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रयत्न तसेच मुलींना शिक्षण दिले पाहिजे, समाजातील अनिष्ट प्रथा, सतीपथा, केशवपन आदींचा विरोध अतिशय चांगल्या प्रकारे चित्रपटामध्ये चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांची महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रथम समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी केली असा दाखविला असून शेवट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पन्नास वर्षानंतर त्यांचे कार्य अविरत चालू ठेवले. प्रत्यक्षात भेटले नसले तरी त्यांच्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानून आपले कार्य चालू ठेवले, असा चित्रपटाचा शेवट केला.आणि महात्मा जोतीराव फुले यांचे कार्य पुढे चालूच आहे अशी जानीव प्रेक्षकांना करून दिली. एकूण पाहता चित्रपट प्रेक्षकांना अडीच तास एकाच जागेवर बसून संपूर्ण इतिहासाची जाणीव व मनोरंजन करणारा हा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाचे सर्व शो संपूर्ण हाऊसफुल चालत असून सिनेमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
चित्रपट दर्जा- 4.5
चित्रपट समीक्षक- प्रा. प्रज्ञानंद थोरात, पत्रकार व शिक्षक, अकोला